setback for beneficiaries of the 2019 farm loan waiver; debt relief now under the shadow of new conditions : २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्यांना नवा धक्का; कर्जमुक्तीवर अटींचे सावट
Buldhana राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’कडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा असल्या तरी प्रत्यक्षात अनेकांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या घोषणेकडे आशेने पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सन २०१९ मधील ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’चा लाभ जिल्ह्यातील सुमारे १.९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र, नव्या योजनेत या लाभार्थी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार नसून, त्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
नव्या योजनेनुसार, ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पीक कर्ज घेतले आहे आणि ते कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असून ३१ मार्च २०२६ पर्यंत त्याची परतफेड झालेली नसेल, अशा शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीऐवजी केवळ ५० हजार रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे.
Water shortage : जिल्ह्यातील १५८ गावांत पाणीटंचाईचे संकट; ३८ गावांना टँकरचा आधार
जिल्ह्यात सुमारे पाच लाख खातेदार शेतकरी असून त्यापैकी अडीच लाख शेतकऱ्यांनी कृषी कर्ज घेतले आहे. यापैकी सुमारे १.४० लाखांहून अधिक शेतकरी पीक कर्ज थकबाकीदार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, दोन लाख रुपयांपर्यंतच्या थेट कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेने कमी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार खातेदारांची आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या दीड लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम प्रथम बँकेत जमा करावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन लाख रुपयांपेक्षा अधिक पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम स्वतः भरावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. खरीप हंगाम तोंडावर असताना अतिरिक्त कर्जाची रक्कम कशी फेडायची, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.








