व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar bawankule: काँग्रेसचेच लोक प्रफुल्ल गुडधेंचे ‘शटर’ बंद करतील; चंद्रशेखर बावनकुळे यांचा...

Chandrashekhar bawankule: काँग्रेसचेच लोक प्रफुल्ल गुडधेंचे ‘शटर’ बंद करतील; चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

Praful gudadhe will face internal politics of congress, bawankule claims : काँग्रेसची अंतर्गत गटबाजी टोकाला गेल्याची टीका

Nagpur काँग्रेसचे नवनियुक्त नागपूर शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांचे वक्तव्य अत्यंत बालिशपणाचे असून, शहराध्यक्षपद मिळाल्यामुळे ते सध्या कमालीच्या अतिउत्साहात आहेत. नागपूर शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी किती टोकाला गेली आहे, हे संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे. त्यामुळे भाजपचे शटर बंद करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गुडधे यांचेच राजकीय ‘शटर’ काँग्रेसमधील त्यांचा विरोधी गट लवकरच कायमचे बंद करेल, अशा टोकदार शब्दांत महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला.

मंगळवारी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय व प्रशासकीय विषयांवर पक्षाची आक्रमक भूमिका स्पष्ट केली.

प्रफुल्ल गुडधे यांच्या विधानाचा समाचार घेतल्यानंतर बावनकुळे यांनी भाजपच्या नगरसेवकांच्या प्रशिक्षण दौऱ्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व नगरसेवक पक्षाच्या किंवा शासकीय पैशांवर नव्हे, तर पूर्णपणे स्वतःच्या खर्चाने या प्रशिक्षणासाठी जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातील काही जण पर्यटनासाठी जात असले, तरी त्यांनी पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वखर्चाने जाण्याचा निर्णय घेतला आहे, ही भाजपमधील सुसंस्कृत आणि आदर्श परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचे कौतुक करताना बावनकुळे यांनी त्यांना एक कष्टाळू आणि निष्ठावान कार्यकर्त्या संबोधले. देशात आणि भारतीय जनता पक्षात त्यांना मोठी मान्यता असून, त्यांनी पक्षासाठी घेतलेली प्रत्येक भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली असल्याचे ते म्हणाले.

Farmers loan waiver : दोन लाख नव्हे, अनेक शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांचीच कर्जमुक्ती?

यावेळी सबसिडीतील सवलतींच्या कपातीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी जनतेला धीर धरण्याचे आवाहन केले. “काही वेळा परिस्थितीनुसार शासकीय सवलती कमी झाल्याचे दिसते; मात्र परिस्थिती स्थिर झाल्यानंतर त्या पूर्ववत केल्या जातात. कोरोनाच्या कठीण काळातही देशात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि नंतर ती पुन्हा सामान्य झाली. सध्याच्या स्थितीवरून विरोधकांनी राजकारण करण्याची गरज नाही, नागरिकांना यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल,” असे ते म्हणाले. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, मोदीजींचा कार्यकाळ हा भारताच्या इतिहासातील अत्यंत ऐतिहासिक काळ आहे. भविष्यात त्यांच्यासारखा दीर्घ, प्रभावी आणि निर्णयक्षम कार्यकाळ पूर्ण करणे जगातील कोणत्याही नेत्यासाठी अत्यंत कठीण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Water shortage : जिल्ह्यातील १५८ गावांत पाणीटंचाईचे संकट; ३८ गावांना टँकरचा आधार

शेवटी, महायुतीमधील अर्थखात्याच्या संभाव्य वाटपाबाबत आणि अंतर्गत नाराजीच्या चर्चांवर बोलताना बावनकुळे यांनी सर्व आलबेल असल्याचे संकेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसून यावर अत्यंत योग्य निर्णय घेतील. महायुतीमधील कोणत्याही घटक पक्षावर किंवा नेत्यावर अजिबात अन्याय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांच्या टीकेतील हवा काढून घेतली.

error: Content is protected !!