Prime Minister Modi’s historic milestone is a clarion call of victory for a New India : घरावर तुळशीपत्र नव्हे, तुळशीची कुंडी ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समर्पणाचा गौरव
Nagpur : भारताच्या राजकीय इतिहासात उद्या एक नवा अध्याय लिहिला जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविण्याचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवणार आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ४ हजार ३९७ दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मागे टाकत मोदीजी नवा इतिहास रचणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करताना भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, मोदीजींचा हा महाविक्रम म्हणजे भारताच्या नव्या युगाचा विजयघोष आहे, असे गौरवोद्गार काढले.
नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची ओळख ही त्याग, तपस्या आणि बलिदानातून घडलेली आहे. राष्ट्रहिताला सर्वोच्च मानत स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून या पक्षाची वाटचाल उभी राहिली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी केवळ घरावर तुळशीपत्र नव्हे, तर तुळशीची कुंडी ठेवून स्वतःला राष्ट्रकार्यासाठी अर्पण केले आहे. त्यामुळे मोदीजींचा हा विक्रम केवळ एका नेत्याचा नसून, राष्ट्रसेवेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या समर्पणाचा आणि कष्टाचा गौरव आहे.
ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारताने विकास, सुशासन, आत्मनिर्भरता आणि जागतिक प्रतिष्ठेच्या क्षेत्रात अभूतपूर्व झेप घेतली आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर राहून त्यांनी नेहमीच जनतेचा विश्वास संपादन केला आणि प्रत्येक निर्णय राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवून घेतला. त्यामुळे पंडित नेहरू यांच्या कार्यकाळापेक्षाही अधिक काळ देशाचे यशस्वी नेतृत्व करण्याचा हा टप्पा गाठणे, हे त्यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या अढळ विश्वासाचे जिवंत प्रतीक आहे.
Navneet rana: कोणामुळे राज्यसभेची संधी हुकली, नवनीत राणा यांनी सर्वच सांगितलं
देशगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदी यांनी भारताला नव्या आत्मविश्वासाने आणि ताकदीने जगासमोर उभे केले आहे. त्यांचा हा महाविक्रम म्हणजे ‘विकसित भारताच्या’ संकल्पनेला देशातील जनमानसाने दिलेली मोठी मंजुरी आहे. हा सुवर्णक्षण प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी अत्यंत अभिमानाचा, प्रेरणेचा आणि आनंदाचा आहे, असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले. दरम्यान, मोदीजींच्या नावावर उद्या नोंदविला जाणारा हा ऐतिहासिक विक्रम भारतीय राजकारणातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड मानला जात असून, या निमित्ताने देशभरातील भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.








