व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ncert row : एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा विस्तार पुन्हा झळकणार

Ncert row : एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा विस्तार पुन्हा झळकणार

ncert-maratha-empire-map-row-protest-at-azad-maidan-mumbai : नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ आझाद मैदानावर भव्य आंदोलन

Nagpur : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली विस्तार दर्शविणारा नकाशा वगळण्यात आल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला असून, या निर्णयाविरोधात महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठा इतिहासाच्या जतनासाठी आणि संबंधित निर्णयाच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानावर भव्य आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन नागपूर राजघराण्याचे वंशज राजे मुधोजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि NCERT यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. मराठा साम्राज्याचा इतिहास आणि त्याचे शैक्षणिक महत्त्व अबाधित ठेवण्याची मागणी आंदोलकांनी केली. मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित माहिती पाठ्यपुस्तकांतून वगळली जाऊ नये, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

Reshuffle modi cabinet : राजकीय हालचालींना वेग; मोदी मंत्रिमंडळात फेरबदलांची शक्यता

आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारच्या वतीने राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आझाद मैदान येथे उपस्थित राहून आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी राज्य सरकार या विषयावर सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर पंकज भोयर यांनी राजे मुधोजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली.

या भेटीत ‘NCERT च्या इतिहासाच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्यात यावा’ या प्रमुख मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी मंत्री पंकज भोयर, शिवाजीराजे जाधवराव, कुणाल मालुसरे, वीरेंद्र पवार, नितीन चौगुले, ॲड. आशिष गायकवाड, रविंद्र पडवळ, विलास पांगारकर, प्रशांत सावंत, ॲड. पुष्पा शिंदे, याचिकाकर्ते ऋषिकेश निकम, शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.

Jawed zakariya: नेते राजीनामा देतात, मग अधिकारी का नाही?; अकोला रुग्णालय प्रकरणावर जावेद जकरिया यांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर केंद्र सरकार आणि NCERT यांच्याकडे सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, मराठा इतिहासतज्ज्ञांचा पुरेसा सहभाग नसलेल्या समितीकडून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत, तो मागे न घेतल्यास न्यायालयीन लढाईबरोबरच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भोसले राजघराणे आणि शिवप्रेमींनी दिला आहे.

मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी संबंधित शैक्षणिक विषयावरून निर्माण झालेला हा वाद आगामी काळात अधिक चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!