Mungantiwar’s Support Gives New Life to 3-Year-Old Girl After Successful AIIMS Surgery : वेदनेची दखल घेत तातडीने सुरू झाली उपचारांची प्रक्रिया
Chandrapur : लोकप्रतिनिधीपद म्हणजे केवळ राजकारण आणि विकासकामे नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकाच्या वेदनेवर फुंकर घालणे होय, याचा प्रत्यय आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा आणून दिला आहे. त्यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एका अत्यंत गरीब कुटुंबातील तीन वर्षीय चिमुकलीवर नागपूर येथील एम्स रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून तिला नवजीवन मिळाले आहे.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील मलगाव येथील रहिवासी राजमन द्विवेदी हे चंद्रपूर येथील ऐतिहासिक श्री महाकाली देवस्थानाशी संबंधित महाकाले कुटुंबाकडे अनेक वर्षांपासून माता महाकालीच्या नैवेद्य व स्वयंपाकाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या तीन वर्षीय नातीला जन्मापासूनच कमरेच्या हाडाची गंभीर समस्या होती. त्यामुळे तिला चालताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. संबंधित डॉक्टरांनी योग्य वयात शस्त्रक्रिया न झाल्यास भविष्यात गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशारा दिला होता. मात्र कुटुंबाची अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असल्याने उपचारासाठी लागणारा खर्च उचलणे त्यांच्यासाठी अशक्य होते.
Sudhir Mungatiwar : पंतप्रधान मोदीजींचा महाविक्रम म्हणजे भारताच्या नव्या युगाचा विजयघोष
आपली व्यथा राजमन द्विवेदी यांनी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आशाताई प्रकाश महाकाले यांच्यासमोर मांडली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आशाताई महाकाले यांनी तातडीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या मुनगंटीवार यांनी विलंब न करता नागपूर येथील एम्स रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपचाराची व्यवस्था केली. तसेच आपले स्वीय सहायक सागर खडसे यांना संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.
या प्रयत्नांना यश येत अखेर ७ जून २०२६ रोजी नागपूर येथील एम्स रुग्णालयात बालिकेवर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर बालिकेच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असून कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Sudhir Mungatiwar: विधान परिषदेच्या आमदारांचा जनतेला काय फायदा? सुधीर मुनगंटीवार यांचा खडा सवाल
यावेळी राजमन द्विवेदी आणि त्यांचे पुत्र विपिन द्विवेदी यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच आशाताई महाकाले यांचे मनःपूर्वक आभार मानले. आर्थिक परिस्थितीमुळे मुलीच्या उपचाराची आशा जवळपास सोडून दिली होती. मात्र योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे आमच्या चिमुकलीला नवजीवन मिळाले, अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गरजू आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घेणे हीच खरी लोकसेवा असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून देत सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एका कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा आणि आनंदाचा नवा किरण निर्माण केला आहे.
_








