Demand for an Impartial Inquiry into the Incident of a Tribal Woman Carrying Her Ailing Husband on Her Back : आदिवासी महिलेने आजारी पतीला पाठीवर वाहून नेल्याच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; डीनच्या राजीनाम्याचीही मागणी
Akola शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) अकोला येथे एका आदिवासी महिलेला आपल्या आजारी पतीला पाठीवर उचलून रुग्णालय परिसरात मदतीसाठी फिरावे लागल्याच्या घटनेवर सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या गंभीर अपयशाचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
जावेद जकरिया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले की, एखादा अपघात, गंभीर घटना किंवा प्रशासकीय हलगर्जीपणा समोर आल्यानंतर मंत्री, आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मात्र, सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या जबाबदारीबाबत जाब विचारला गेला पाहिजे. “जेव्हा नेते राजीनामा देतात, तेव्हा अधिकारी का नाही?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले की, एका आदिवासी महिलेला आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात मदतीसाठी भटकावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब आहे. या घटनेचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाल्याने अकोल्याच्या प्रतिमेलाही धक्का बसला असून सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णालयात व्हीलचेअर, स्ट्रेचर आणि इतर मूलभूत सुविधा वेळेवर उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे जकरिया यांनी नमूद केले. या सुविधांच्या अभावामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असेल, तर त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनूने यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, असेही त्यांनी म्हटले.
राज्य सरकारने सरकारी रुग्णालयांमधील सुविधा आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भविष्यात कोणत्याही गरीब, आदिवासी किंवा गरजू कुटुंबाला अशा प्रकारच्या वेदनादायक परिस्थितीचा सामना करावा लागू नये, असे आवाहन जावेद जकरिया यांनी केले.








