Chandrashekhar bawankule attacks opponent, says Congress’s defeat is sure : ६०० हून अधिक मतांचे भक्कम संख्याबळ असल्याचा दावा
Nagpur नागपूर आणि अमरावती या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप महायुतीचेच उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. आमच्याकडे ६०० हून अधिक मतांचे भक्कम संख्याबळ असल्याने आम्हाला कोणावरही दबाव टाकण्याची किंवा पैसे वाटण्याची अजिबात गरज नाही. उलट, समोर पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळेच काँग्रेस आता भाजपवर बिनबुडाचे आरोप करून स्वतःची लाज वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, अशा कडक शब्दांत राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. भाजपने आपल्या नगरसेवकांना गोव्याला पाठवल्यावरून काँग्रेसने भाजप घाबरला अशी जी टीका केली होती, तिचा बावनकुळे यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्ही आमचे नगरसेवक पर्यटनाला नेले म्हणजे आम्ही घाबरलो असा त्याचा अर्थ होत नाही. भाजप आपल्या लोकप्रतिनिधींची आणि कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्ष आहे. निवडणुकीच्या अशा पार्श्वभूमीवर पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्र आल्यामुळे संघटनात्मक समन्वय अधिक मजबूत होतो. आम्ही सर्वजण एकसंध आहोत, हाच संदेश यातून जातो. त्यामुळे आमच्या मतदारांची काळजी विरोधकांनी करण्याची मुळीच गरज नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी भाजप बॅकफूटवर नसल्याचा दावा केला.
यावेळी बावनकुळे यांनी अमरावती आणि नागपूरच्या जागांवरून काँग्रेसच्या अंतर्गत परिस्थितीवर बोट ठेवत त्यांना स्वतःचे घर सांभाळण्याचा सल्ला दिला. “काँग्रेसने भाजपवर टीका करण्यापेक्षा आधी आपले उमेदवार सांभाळावेत. त्यांचे अमरावतीचे उमेदवार आजारी असून आयसीयूत दाखल आहेत, हे त्यांच्याच नेत्यांच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी आपल्या उमेदवाराची काळजी घ्यावी,” असा टोला त्यांनी लगावला. अमरावती विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे पारडे अत्यंत जड असून तिथे दबाव टाकल्याचे विरोधकांचे आरोप निव्वळ नैराश्यातून आले आहेत, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार अतुल लोंढे यांनी घेतलेल्या बैठकांवर बोलताना बावनकुळे यांनी या बैठका केवळ फार्स असल्याचे म्हटले. नागपूर आणि अमरावतीत निवडणुकीचा निकाल जवळपास आधीच स्पष्ट झाला आहे. भाजप महायुतीकडे तब्बल ६०० च्या आसपास मते आहेत, तर विरोधकांकडे जेमतेम २०० ते २२५ मतांचे संख्याबळ आहे. एवढा मोठा फरक असताना अशा बैठका घेऊन काहीही साध्य होणार नाही. मुळात विरोधी आघाडीतच प्रचंड मतभेद आणि विस्कळीतपणा आहे, असा दावा करत बावनकुळे यांनी दोन्ही जागांवर महायुतीचाच झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.








