व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prafulla gudadhe: बहुमताची भाषा करणाऱ्या भाजपला नेमकी भीती कोणाची? नागपूरच्या लढतीवरून काँग्रेसचा...

Prafulla gudadhe: बहुमताची भाषा करणाऱ्या भाजपला नेमकी भीती कोणाची? नागपूरच्या लढतीवरून काँग्रेसचा टोकदार सवाल

Who exactly is the BJP afraid of despite claiming a majority? Congress questions : भाजपने खबरदारी घेत आपल्या सर्व नगरसेवकांना तातडीने ‘गोवा पर्यटना’साठी रवाना केले, प्रफुल गुडधे यांचा दावा

Nagpur स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे, आमचाच उमेदवार निवडून येणार, त्यामुळे काँग्रेसने उगाच इंधन आणि पैशाचा अपव्यय करू नये, असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांच्या कृतीने मात्र सध्या वेगळेच चित्र उभे केले आहे. जर बहुमत इतके भक्कम आहे, तर मग भाजपच्या नगरसेवकांना तातडीने गोव्याला हलवण्याची वेळ का आली? भाजपला नक्की कोणाची आणि कशाची भीती सतावते आहे? असा थेट आणि धारदार सवाल आता काँग्रेसने उपस्थित केल्याने नागपूरचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत भाजप महायुतीकडे तब्बल ५०० हून अधिक मते आहेत, तर काँग्रेस महाविकास आघाडीकडे केवळ २०० च्या आसपास मते आहेत. ताकदीचा विचार करता भाजपचे पारडे प्रचंड जड आहे, असे असतानाही भाजपने कमालीची खबरदारी घेत आपल्या सर्व नगरसेवकांना तातडीने ‘गोवा पर्यटना’साठी रवाना केले आहे. बुधवारपासून हे सर्व नगरसेवक गोव्यात तळ ठोकून आहेत. भाजपच्या याच भूमिकेवर काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी जोरदार टोलेबाजी केली असून, आमचा उमेदवार लढण्यावर ठाम आहे आणि आम्हाला कोणाचीही भीती नाही, उलट स्वतःकडे बहुमत असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपलाच आपल्या विजयाची शाश्वती वाटत नसल्याने त्यांनी आपल्याच नगरसेवकांना गोव्यात नेऊन बंधिस्थ केल्याचा घणाघात त्यांनी केला.

Abhijeet dipke : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी २० जूनला दिल्लीत आंदोलन

भाजपकडून या दौऱ्याचे समर्थन करताना हे सर्व नगरसेवक गोव्यावरून थेट मुंबईला एका ‘अभ्यास वर्गा’साठी जाणार आहेत आणि मतदानाच्या दिवशीच मुंबईवरून नागपुरात दाखल होतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, राजकीय वर्तुळात या ‘अभ्यास वर्गा’पेक्षा भाजपला अंतर्गत क्रॉस व्होटिंगची म्हणजेच मते फुटण्याची मोठी भीती सतावते आहे, अशीच चर्चा रंगली आहे. जर विजय इतकाच निश्चित होता, तर मग नगरसेवकांना नागपुरात थांबवून ठेवण्याचे धैर्य भाजपने का दाखवले नाही आणि मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांना शहराबाहेर फिरवण्यामागे नक्की कोणते राजकारण सुरू आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजप महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर अमरावतीमध्येही काँग्रेसचे उमेदवार आयसीयूत दाखल झाल्यामुळे तिथली निवडणूक केवळ औपचारिकता उरल्याचे बोलले जात आहे. अमरावतीतील उमेदवार भाजपला ‘मॅनेज’ झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केल्याने आधीच खळबळ उडाली आहे. मात्र, नागपूरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे केलेले आवाहन काँग्रेसने स्पष्ट शब्दांत धुडकावून लावले आहे.

Sharad pawar : मोदी-नेहरू तुलना अशक्य; स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विसरता येणार नाही

भाजपने डॉ. राजीव पोतदार यांना रिंगणात उतरवले असताना, काँग्रेसने आपले प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या रूपाने तगडा उमेदवार देऊन भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे संख्याबळ पाठीशी असूनही भाजपने घेतलेला हा बचावात्मक पवित्रा आणि नगरसेवकांची ‘गोवा ते मुंबई’ वारी, यामुळे नागपूरची ही निवडणूक आता संपूर्ण राज्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

error: Content is protected !!