व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Harshjit deshmukh, yashomati thakur : हर्षजित देशमुख प्रचारातून दूर; यशोमती ठाकूर यांचा...

Harshjit deshmukh, yashomati thakur : हर्षजित देशमुख प्रचारातून दूर; यशोमती ठाकूर यांचा आर्थिक व्यवहारांचा आरोप

Harshjit Deshmukh stays away from the campaign; Yashomati Thakur alleges financial dealings : निवडणूक व्यवस्थापनासाठी १५ ते २० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चा सुरू असल्याचा दावा

Amravati विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून प्रचारात सक्रिय दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, निवडणूक व्यवस्थापनासाठी १५ ते २० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चा सुरू असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हर्षजित देशमुख यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने स्थानिक नेत्यांची आढावा बैठकही घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशमुख प्रचारात दिसत नसल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना यशोमती ठाकूर यांनी हर्षजित देशमुख हे सध्या नागपूर येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत असल्याचे सांगितले. मात्र, आयसीयूमध्ये दाखल असल्याचे सांगितले जात असतानाही ते माध्यमांशी संवाद साधत असल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर उमेदवार प्रचारापासून दूर राहण्यामागे आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा सुरू असल्याचाही दावा त्यांनी केला.

Abhijeet dipke : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी २० जूनला दिल्लीत आंदोलन

याशिवाय, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या चर्चा सुरू असताना राज्याचे गृहमंत्री आणि गृह विभाग काय करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेस पक्षाची पुढील भूमिका काय असेल, याबाबत विचारले असता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जो निर्णय घेतील, त्यानुसार पुढील पावले उचलली जातील, असे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.
आरोप निराधार; लवकरच प्रचारात सहभागी होणार : हर्षजित देशमुख
दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या आरोपांना हर्षजित देशमुख यांनी फेटाळून लावले आहे.

देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “गेल्या तीन-चार दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते आणि मानसिक तणावही जाणवत होता. त्यामुळे मी नागपूरला परतलो. पुन्हा अमरावतीला येत असताना दम लागत असल्याने तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झालो. तपासणीनंतर डॉक्टरांनी उपचारासाठी रुग्णालयात थांबण्याचा सल्ला दिला असून सध्या त्यानुसार उपचार सुरू आहेत.”

Sharad pawar : मोदी-नेहरू तुलना अशक्य; स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विसरता येणार नाही

“उमेदवारी मागे घेण्याचा माझा कोणताही विचार नाही. माझ्याकडून प्रचार सुरू असून प्रचार साहित्य सहकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते रुग्णालयात भेटून गेले आहेत. प्रकृतीत सुधारणा होताच मी पुन्हा प्रचारात सक्रिय सहभागी होणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यशोमती ठाकूर यांनी केलेले आरोप पूर्णपणे निराधार असून पक्षाची आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.

error: Content is protected !!