chandrapur-congress-crisis-pratibha-dhanorkar-vs-vijay-wadettiwar-group-leader-row : 5 नगरसेवक प्रतिभा धानोरकरांच्या गोटात, गटनेता बदलासाठी निर्णायक हालचाली
Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत सत्तासंघर्ष पुन्हा उफाळून आला असून खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईने नवे वळण घेतले आहे. वडेट्टीवार गटाचे पाच नगरसेवक अचानक धानोरकर गटात दाखल झाल्याने महानगरपालिकेतील काँग्रेसच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर काँग्रेसचे विद्यमान गटनेते राजेश अडूर यांची खुर्ची धोक्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी सकाळी 11 वाजता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थानी काँग्रेस नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदावर बदल करण्याबाबत निर्णायक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजेश अडूर हे विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले जात असल्याने त्यांना पदावरून हटवण्यासाठी धानोरकर गटाने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे.
Mlc election: विधान परिषद निवडणुक 11 मतदारसंघांत रंगणार चुरशीची लढत !
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वडेट्टीवार गटातील सुनील खंडेलवाल, वनश्री मेश्राम, करुणा चालखुरे, शिला सिडाम आणि आकाश मानकर या पाच नगरसेवकांनी धानोरकर गटाची वाट धरल्याचे समोर आले आहे. या राजकीय भूकंपामुळे महानगरपालिकेतील काँग्रेसचे सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे.
यापूर्वी 27 नगरसेवकांच्या काँग्रेस गटात विजय वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांची संख्या 17 होती, तर प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूने 10 नगरसेवक होते. मात्र पाच नगरसेवकांनी गटबदल केल्यानंतर धानोरकर समर्थकांची संख्या थेट 15 वर पोहोचली आहे. दुसरीकडे वडेट्टीवार गटाची ताकद 12 नगरसेवकांवर आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नेतृत्वावर आता धानोरकर गटाचे वर्चस्व वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचा हा संघर्ष नवीन नाही. महानगरपालिका निवडणुकीनंतर गटनेते निवडीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये मोठे राजकीय नाट्य रंगले होते. नगरसेवकांची पळवापळवी, गुप्त बैठका आणि अपहरणाच्या आरोपांपर्यंत पोहोचलेल्या या संघर्षाने राज्याचे लक्ष वेधले होते. आता पुन्हा त्याच संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
Ncp congress merger : शरद पवार गटाच्या काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चां, नाना पटोलें अचानक दिल्लीत !
गटनेता बदलण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. त्यासाठी किमान 18 नगरसेवकांचे समर्थन आवश्यक आहे. सध्या धानोरकर गटाकडे 15 नगरसेवक असल्याचे सांगितले जात असले तरी उर्वरित नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवण्यात त्यांना यश येते का, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत चंद्रपूर काँग्रेसमध्ये आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसमध्ये धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार संघर्षाने नवे वळण घेतले असताना, राजकारण तापू लागले आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या हालचालींवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








