ncp-sharad-pawar-group-congress-merger-discussions-speed-up-nana-patole-delhi-meeting : भाजपविरोधी एकजुटीसाठी मोठ्या राजकीय हालचाली?
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटo काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपविरोधी मतांचे विभाजन रोखण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी पातळीवर हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांना दिल्लीला बोलावल्याने चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
काँग्रेस हायकमांडने प्रथम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले होते. त्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही तातडीने दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच शरद पवार यांनी दिला होता. काही कारणांमुळे त्यावर निर्णय घेण्यास विलंब झाला. मात्र, सध्याच्या राष्ट्रीय राजकारणातील परिस्थिती आणि संविधानिक संस्थांबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.
Sunetra pawar : पक्षहितासाठी कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही!
नाना पटोले यांनी पुढे सांगितले की, देशातील धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन थांबवून संविधान आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व या विषयावर विचारमंथन करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भाजपला प्रभावी पर्याय उभा करण्यासाठी विविध प्रादेशिक आणि धर्मनिरपेक्ष पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे, अशी भूमिका काही राजकीय नेत्यांकडून मांडली जात आहे. याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच काँग्रेसमधून वेगळे झालेले पक्ष पुन्हा मूळ काँग्रेससोबत एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती. त्यांनी विशेषतः शरद पवार यांनी या प्रक्रियेत पुढाकार घ्यावा, असे मत मांडले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा मधील प्रमुख नेत्यांनी या चर्चांवर सावध प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसकडून कोणताही अधिकृत विलिनीकरणाचा प्रस्ताव प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अशा चर्चांबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी टाळाटाळ केली.
जितेंद्र आव्हाड यांनीही विलिनीकरणासंदर्भातील अंतिम निर्णय शरद पवारच घेतील, असे सांगितले. आमदार रोहित पवार यांनी देखील पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी भूमिका व्यक्त केली. दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा प्रकारचा कोणताही अधिकृत प्रस्ताव सध्या नसल्याचे सांगितले आहे.
मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटयांच्यातील वाढत्या संवादामुळे आणि दिल्लीतील बैठकींमुळे आगामी काळात महाराष्ट्रासह राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. भाजपविरोधी व्यापक आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








