Harshvardhan Sapkal claims that the election process was conducted in accordance with the party organization’s recommendations : यशोमती ठाकूर यांचे आरोप फेटाळून लावले, पक्ष संघटनेच्या शिफारशीनुसार प्रक्रिया झाल्याचा दावा
Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावतीच्या उमेदवार निवडीबाबत महत्त्वपूर्ण खुलासा करत, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
यशोमती ठाकूर यांनी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत प्रदेश नेतृत्वाने त्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला होता. तसेच उमेदवारी प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करत उमेदवार निवडीची संपूर्ण प्रक्रिया स्थानिक निरीक्षक आणि पक्ष संघटनेच्या शिफारशीनुसार झाल्याचा दावा केला.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील काँग्रेसच्या नऊ विधान परिषद मतदारसंघांसाठी स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित मतदारसंघातील निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अहवाल दिला. त्यानंतर त्या अहवालांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात आली.
सपकाळ यांनी सांगितले की, अमरावती मतदारसंघासाठी यशोमती ठाकूर या निरीक्षक म्हणून नियुक्त होत्या आणि त्यांच्या शिफारशीवरूनच उमेदवाराचे नाव पुढे आले. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत कोणाचाही हस्तक्षेप झाला नसून पक्षाच्या नियमानुसार निर्णय घेण्यात आला, असा दावा त्यांनी केला.
Us Iran peace deal : अमेरिका-इराण शांतता कराराची मोठी घोषणा; कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
यशोमती ठाकूर यांनी उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र सपकाळ यांनी हे आरोप फेटाळून लावत उमेदवार निवड पूर्णपणे संघटनात्मक प्रक्रियेनुसार झाल्याचे स्पष्ट केले.
या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरणांचीही चर्चा रंगली आहे. उमेदवारी व आर्थिक व्यवहारांच्या आरोपांनंतर वंचितची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
या संपूर्ण वादामुळे अमरावती जिल्ह्यात काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील आरोप-प्रत्यारोपांमुळे काँग्रेसची प्रतिमा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, संघटनात्मक एकजूट राखण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर उभे राहिले आहे.








