Harshjit Deshmukh returns to the campaign trail of legislative elections : यशोमती ठाकूर मुंबईला रवाना, अमरावती विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली,
Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीस अवघे सहा दिवस शिल्लक असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांना नागपूर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, ते पुन्हा प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या देशमुख यांच्या प्रचारातील अनुपस्थितीमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात कायम असल्याचे स्पष्ट करत प्रचाराला वेग देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
देशमुख यांनी सांगितले की, निवडणुकीतून माघार घेण्याचा कोणताही प्रश्न नसून विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप निराधार आहेत. लवकरच अमरावतीत येऊन प्रचार प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाही मतदार आणि कार्यकर्त्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
Rohit pawar : कर्जमाफीच्या अटींवर सरकार सकारात्मक, रोहित पवारांनी आंदोलन थांबवले !
दरम्यान, काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीसोबत संवाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते निलेश विखेकर यांनीही काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याची पुष्टी केली असून योग्य वेळी भूमिका जाहीर केली जाईल, असे म्हटले आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसांत घडणाऱ्या हालचाली निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Rohit pawar : रोहित पवारांच्या प्रकृतीची चिंता वाढली; आई-वडील, पत्नी आणि मुलांचे अश्रू अनावर,
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षक तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर शनिवारी सकाळी मुंबईला रवाना झाल्या. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संभाव्य राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी त्या मुंबईत गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे काँग्रेसच्या पुढील रणनीतीबाबत उत्सुकता वाढली आहे.








