Record-Holder Mungantiwar Set for a Power-Packed Performance in the Maharashtra Assembly : तब्बल ३८ अशासकीय विधेयके विचारार्थ; जनहिताच्या प्रश्नांवर कायद्याच्या माध्यमातून मांडणार मुनगंटीवार भूमिका
Chandrapur : अभ्यास, आक्रमक मांडणी आणि संसदीय कामकाजातील विक्रमी योगदान यांची सांगड घालणारे आमदार सुधीर मुनगंटीवार येत्या अधिवेशनात पुन्हा एकदा दमदार बॅटिंग करण्यास सज्ज झाले आहेत. अशासकीय विधेयकांच्या बाबतीत स्वतःचाच विक्रम मोडणाऱ्या मुनगंटीवारांची तब्बल ३८ अशासकीय विधेयके २२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात विचारार्थ ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे संसदीय कामकाजात पुन्हा एकदा मुनगंटीवार केंद्रस्थानी आले आहेत.
विधिमंडळात जनहिताचे प्रश्न केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना कायद्याचे स्वरूप देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न मुनगंटीवार करत आले आहेत. त्यामुळेच त्यांना विधिमंडळात ‘अशासकीय विधेयकांचा विक्रमवीर’ म्हणून ओळखले जाते. यापूर्वी सर्वाधिक अशासकीय विधेयके सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असताना, यंदा ३८ विधेयकांसह त्यांनी स्वतःचाच विक्रम मागे टाकला आहे.
कारागृह सुधारणा, जमीन महसूल, शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय प्रशासन, स्पर्धा परीक्षा, कामगार कल्याण, गृहनिर्माण, भाडे नियंत्रण, सहकार, महिलांची सुरक्षा, अश्लील जाहिरातींना प्रतिबंध, झोपडपट्टी पुनर्विकास अशा विविध क्षेत्रांशी संबंधित महत्त्वपूर्ण विषय या विधेयकांमधून मांडण्यात आले आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना कायदेशीर चौकटीतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न या विधेयकांमधून दिसून येतो.
Sudhir mungantiwar: मुनगंटीवारांचा पुढाकार, चंद्रपुरात साकारले २९.९९ कोटींचे अत्याधुनिक जीएसटी भवन
लोकशाही व्यवस्थेत कायदेमंडळ हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, या विश्वासातून मुनगंटीवार यांनी अशासकीय कामकाजाला विशेष महत्त्व दिले आहे. विरोधी पक्षात असो वा सत्तापक्षात, जनतेच्या प्रश्नांसाठी संसदीय साधनांचा प्रभावी वापर करण्याची त्यांची परंपरा कायम राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक विधेयकाकडे राजकीय वर्तुळाबरोबरच संसदीय अभ्यासकांचेही लक्ष लागलेले असते.
येत्या अधिवेशनात या विधेयकांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता असून, अनेक महत्त्वाचे सामाजिक व प्रशासकीय प्रश्न सभागृहाच्या केंद्रस्थानी येणार आहेत. त्यामुळे ‘विक्रमवीर’ सुधीर मुनगंटीवार यांची ही दमदार बॅटिंग राज्याच्या राजकारणात आणि संसदीय कामकाजात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार आहे.








