Farmers stage protest in Sindkhed Raja over crop insurance; vow to seek justice through the courts : हक्काचा विमा नाकारल्याने संताप उसळला; उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा
Sindkhed raja खरीप २०२५ हंगामातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेतकरी योद्धा कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी सिंदखेडराजा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाल्याने परिसरातील पीक विमा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मोर्चेकऱ्यांनी सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांना सादर केले. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी वैयक्तिक अर्जही प्रशासनाकडे जमा केले. चर्चेदरम्यान सोयाबीन पिकासाठी पीक विमा मंजूर होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे संकेत मिळाल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात आला.
शेतकरी नेत्यांनी यावेळी सांगितले की, खरीप हंगामात अनेक भागांत अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस आणि ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. शासनानेही नुकसानीची दखल घेत मदत जाहीर केली होती. अनेक गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी नोंदविण्यात आली असून पंचनामे आणि प्रत्यक्ष पाहणीतही पिकांचे मोठे नुकसान स्पष्ट झाले आहे. असे सर्व निकष शेतकऱ्यांच्या बाजूने असतानाही पीक विमा नाकारला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
Rahul Bondre : मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक; ‘राजकीय सूडातून गुन्हे दाखल’
या पार्श्वभूमीवर आता न्यायासाठी न्यायालयीन लढाई उभारण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे. पुढील १० ते १२ दिवसांत आवश्यक कागदपत्रे, पंचनामे, हवामान नोंदी आणि इतर पुरावे गोळा करून संबंधित पीक विमा कंपनीविरोधात न्यायालयात जाण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
मोर्चाला लोकजागर परिवाराचे सर्वेसर्वा प्रवीण गीते, शेतकरी योद्धा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गजानन जायभाये, बंजारा सेवा संघाचे दत्तू चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विनायक भानुसे पाटील, बळीवंश संघटनेचे नितीन कायंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सिद्धेश्वर आंधळे तसेच सामाजिक कार्यकर्ते गजानन दराडे यांनी संबोधित केले.
यावेळी वक्त्यांनी पीक विमा कंपन्यांच्या धोरणांवर टीका करत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. मोर्चात सहभागी झालेल्या सर्व शेतकरी, कार्यकर्ते आणि संघटनांचे आभार मानत आगामी लढ्यातही एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन शेतकरी योद्धा कृती समितीचे जिल्हा पदाधिकारी बालाजी सोसे यांनी केले.








