Court orders production of the voter register and CCTV footage during the hearing of the Akola West Assembly election petition : ४७२ मते न मोजल्याच्या दाव्याचीही होणार चौकशी; दुहेरी मतदानाच्या आरोपांची होणार तपासणी
Akola काँग्रेसचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजीद खान पठाण यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने सात महत्त्वपूर्ण मुद्दे निश्चित केले असून, त्यामध्ये मतदारांची नावे दोन मतदारसंघांच्या मतदारयादीत असल्याचा दावा, काही मतदारांनी एकापेक्षा अधिक वेळा मतदान केल्याचा आरोप तसेच ४७२ मते मोजण्यात आली नसल्याच्या दाव्याचा समावेश आहे.
न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत माजी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर विचार करण्यात आला. या याचिकेत आमदार साजीद खान पठाण यांच्यासह अन्य एका व्यक्तीला प्रतिवादी करण्यात आले आहे.
न्यायालयाने निश्चित केलेल्या पहिल्या मुद्द्यानुसार, १,१२५ मतदारांची नावे अकोला पश्चिम आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत एकाच वेळी होती का, याची तपासणी केली जाणार आहे. तसेच या मतदारांनी दोन्ही मतदारसंघांत मतदान केले होते का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
Farmers loan waiver : कर्जमाफीच्या यादीत तफावत; हजारो पात्र शेतकरी वंचित असल्याचा आरोप
याशिवाय, ३,६१४ मतदारांची नावे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत एकापेक्षा अधिक ठिकाणी होती का आणि संबंधित मतदारांनी एकापेक्षा अधिक वेळा मतदान केले होते का, याचीही न्यायालयाकडून पडताळणी होणार आहे. कथित अवैध मतांचा स्वीकार झाल्यामुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाला का, हाही मुद्दा सुनावणीसाठी निश्चित करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार, मतदान केंद्र क्रमांक २०३ (शिवाजी हायस्कूल, उत्तर इमारत, खोली क्रमांक १) येथे ४७२ मते मोजण्यात आली नव्हती. या कथित त्रुटीमुळे आमदार साजीद खान पठाण यांची निवड रद्द करण्यास पात्र ठरते का, याचीही न्यायालयाकडून सुनावणीदरम्यान छाननी केली जाणार आहे. तसेच सर्व पक्षकारांना १५ दिवसांच्या आत साक्षीदारांची यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विजय अग्रवाल यांनी स्वतंत्र अर्जाद्वारे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे संबंधित मतदार नोंदवहीच्या प्रमाणित प्रती तसेच अकोला पश्चिम आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही चित्रफिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करत संबंधित कागदपत्रे आणि सीसीटीव्ही चित्रफिती चार आठवड्यांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणातील पुराव्यांवरील पुढील सुनावणी ११ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. त्यामुळे मतदार नोंदवही, सीसीटीव्ही चित्रफिती आणि अन्य पुराव्यांच्या आधारे याचिकेतील आरोपांची न्यायालयीन कसोटी कशी लागते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








