Congress–Uddhav Sena alliance captures Patur Municipal Council; Hidayatkhan Rumkhan elected Municipal President : काँग्रेसच्या उमेदवाराचा १,६०१ मतांनी विजय, विकास योद्धा मंचचा पराभव
Patur खासदार सोडून जात असल्यामुळे नैराश्यात असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विदर्भातील एका नगरपरिषदेतील यशामुळे दिलासा मिळाला आहे. या नगरपरिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी केली होती. शिवसेनेला फक्त दोनच जागा जिंकता आल्या असल्या तरीही आघाडीने विजय मिळवक नगराध्यक्षपद काबीज केले आहे.
पातूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस-उद्धवसेना आघाडीच्या उमेदवाराने नगराध्यक्षपदावर विजय मिळविला आहे. काँग्रेसचे उमेदवार हिदायतखान रुमखान उर्फ इद्दू पैलवान यांनी स्थानिक आघाडी ‘विकास योद्धा मंच’च्या उमेदवाराचा पराभव केला. याशिवाय २० सदस्यांच्या नगरपरिषदेत काँग्रेस व विकास योद्धा मंचचे प्रत्येकी ८ उमेदवार विजयी झाले. भाजप आणि उद्धवसेनेला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर शिंदेसेनेची पाटी कोरी राहिली.
Omraje nimbalkar : मध्यरात्री ठाकरे गटाचे दोन आमदार ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला
पातूर नगरपरिषदेसाठी २० जून रोजी मतदान झाले, तर रविवारी मतमोजणी पार पडली. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर दहा प्रभागांतील २० नगरसेवकपदांसाठी ७५ उमेदवार रिंगणात होते. नगराध्यक्षांसह आठ नगरसेवक निवडून आल्याने काँग्रेसने पालिकेत वर्चस्व मिळविले. तसेच उद्धवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाल्याने काँग्रेस-उद्धवसेना आघाडीचे पालिकेतील वर्चस्व स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धवसेनेची निवडणूकपूर्व युती होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवारांनी ‘विकास योद्धा मंच’च्या नावाने निवडणूक लढविली. या आघाडीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचाही सहभाग होता. शिंदेसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली; मात्र त्यांची पाटी कोरी राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने स्वतंत्रपणे किंवा कोणत्याही आघाडीतून या निवडणुकीत सहभाग घेतला नाही.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हिदायतखान रुमखान यांनी स्थानिक आघाडी ‘विकास योद्धा मंच’चे उमेदवार हाजी सय्यद बुऱ्हान यांचा १,६०१ मतांनी पराभव केला. हिदायतखान रुमखान यांना ६,००९ मते मिळाली, तर हाजी सय्यद बुऱ्हान यांना ४,४०८ मते मिळाली.








