व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mlc election results : कुणाला 5 तर कुणाला शून्य मते; विधान परिषदेत...

Mlc election results : कुणाला 5 तर कुणाला शून्य मते; विधान परिषदेत महाविकास आघाडीची दारुण अवस्था

vidhan-parishad-election-2026-mahayuti-sweeps-16-seats-mva-suffers-worst-defeat : 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा झेंडा

Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत राज्याच्या राजकारणात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 17 पैकी तब्बल 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. विशेष म्हणजे महाविकास आघाडीला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. अनेक मतदारसंघांमध्ये आघाडीच्या उमेदवारांना अत्यल्प मते मिळाल्याने हा निकाल त्यांच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी अपेक्षित पाठिंबा मिळालाच नाही. काही उमेदवारांना अवघी पाच मते मिळाली, तर एका उमेदवाराला एकही मत मिळाले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या संघटनात्मक ताकदीवर आणि स्थानिक पातळीवरील प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सोलापूर मतदारसंघात भाजपचे राजेंद्र राऊत यांनी 483 मते मिळवत विजय मिळवला. शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख यांना केवळ 118 मते मिळाली. जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन यांनी 577 मतांसह एकतर्फी विजय मिळवला, तर ठाकरे गटाचे शरद तायडे यांना अवघी 5 मते मिळाली. हा निकाल निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

Gokul Gite : शिवसेनेचा उमेदवार पाडणाऱ्या गोकुळ गीतेंना एकनाथ शिंदेंचा तातडीचा मुंबई दौऱ्याचा निरोप

सांगली-सातारा मतदारसंघात भाजपचे धैर्यशील कदम यांनी 591 मते मिळवून विजय मिळवला. शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांना 295 मते मिळाली. नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर यांनी 339 मतांसह विजय मिळवला, तर ठाकरे गटाचे कृष्णा आष्टीकर यांना 84 मते मिळाली.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी 304 मते मिळवत विजय संपादन केला. महाविकास आघाडी समर्थित नरेश ईश्वरकर यांना 152 मते मिळाली. अमरावतीत भाजपचे डॉ. प्रवीण पोटे यांनी 390 मतांसह विजय मिळवला. वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली, तर काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेससाठी हा निकाल अत्यंत लाजिरवाणा मानला जात आहे.

धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील यांनी 845 मते मिळवत मोठा विजय मिळवला. काँग्रेसचे महेश देशमुख यांना 124 मते मिळाली. छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाट यांनी 454 मतांसह विजय मिळवला, तर ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांना 134 मते मिळाली.

नागपूरमध्ये भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी 682 मते मिळवत विजय संपादन केला. काँग्रेसचे अतुल लोंढे यांना 130 मते मिळाली. परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान 242 मतांसह विजयी झाले, तर ठाकरे गटाचे डॉ. विवेक नावंदर यांना 159 मते मिळाली.

Vidhan parishad election : विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 16 जागांवर विजय

राज्यातील सर्वाधिक चर्चेच्या नाशिक मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी 357 मते मिळवत विजय मिळवला. नरेंद्र दराडे यांना 248 मते मिळाली. नाशिकमधील हा निकाल संपूर्ण निवडणुकीतील सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

दरम्यान, सहा मतदारसंघांमध्ये निवडणुकीपूर्वीच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून अरुण लखानी, ठाणे-पालघरमधून रविंद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, पुण्यातून विक्रम काकडे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे हे बिनविरोध विजयी झाले.

या निकालामुळे महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपली पकड अधिक मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी हा निकाल गंभीर आत्मपरीक्षणाची वेळ आणणारा ठरला आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांना अत्यल्प मते मिळाल्याने संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्व आणि आगामी निवडणुकांतील रणनीती यावर नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!