Parties intensify grassroots mobilisation ahead of the Zilla Parishad and Panchayat Samiti elections : ग्रामपंचायतींवर लक्ष, जिल्हा परिषदेवर डोळा; शिंदेसेनेच्या बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग
Buldhana जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्या, तरी बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच विविध पक्षांनी तळागाळातील संघटनात्मक बांधणी आणि गावपातळीवरील समीकरणे मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. खामगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या शिंदेसेनेच्या बैठकीतही याच मुद्द्यावर विशेष भर देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये यश मिळवायचे असेल, तर ग्रामपंचायतींवर प्रभावी पकड निर्माण करणे गरजेचे असल्याचा सूर उमटल्याचे सांगितले जाते. ग्रामपंचायत निवडणुका पक्षचिन्हावर होत नसल्या, तरी गावातील सत्ताकारणावर प्रभाव असलेले सरपंच, सदस्य आणि स्थानिक नेते हेच पुढील मोठ्या निवडणुकांमध्ये मतांचे केंद्रबिंदू ठरत असतात. त्यामुळे गावातील राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळविण्यासाठी विविध पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Mlc election results : कुणाला 5 तर कुणाला शून्य मते; विधान परिषदेत महाविकास आघाडीची दारुण अवस्था
राजकीय निरीक्षकांच्या मते, अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व शोधण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. काही गावांमध्ये जुन्या गट-तटांना नव्याने बळ देण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे, तर काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबतही चाचपणी सुरू असल्याचे बोलले जाते.
मात्र या तयारीसोबतच पक्षांसमोर एक वेगळे आव्हानही उभे राहण्याची शक्यता आहे. गावपातळीवर वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा आणि इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारी वाटपाच्या वेळी अंतर्गत नाराजी वाढू शकते. स्थानिक स्तरावरील गटबाजी आणि नेतृत्वातील स्पर्धा निवडणुकीपूर्वीच पक्षांची डोकेदुखी ठरू शकते, अशीही चर्चा सुरू आहे.
Gokul Gite : शिवसेनेचा उमेदवार पाडणाऱ्या गोकुळ गीतेंना एकनाथ शिंदेंचा तातडीचा मुंबई दौऱ्याचा निरोप
एकूणच, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे औपचारिक रणशिंग अद्याप फुंकले गेले नसले, तरी गावचा गड जिंकून जिल्ह्याच्या सत्तेचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच शड्डू ठोकल्याचे चित्र दिसून येत आहे. आगामी काही महिन्यांत गावपातळीवरील या हालचालींमधून जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा निश्चित होणार, हे मात्र निश्चित.








