व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Water crisis : मान्सूनची ओढ वाढली; बुलढाण्यात १.१५ लाख नागरिकांची तहान टँकरवर!

Water crisis : मान्सूनची ओढ वाढली; बुलढाण्यात १.१५ लाख नागरिकांची तहान टँकरवर!

1.15 lakh residents in Buldhana district receive water supply through tankers amid the ongoing water scarcity : पावसाची प्रतीक्षा, टंचाईचा विळखा घट्ट; आठ दिवसांत १६ हजार नवे नागरिक संकटात

Buldhana जूनचा दुसरा पंधरवडा सुरू झाला तरी मान्सूनने अद्याप बुलढाणा जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. जिल्हा प्रशासनाच्या ९ जून आणि १७ जूनच्या अहवालातील आकडेवारीनुसार अवघ्या आठ दिवसांत टंचाईग्रस्त लोकसंख्येत १६ हजारांहून अधिक वाढ झाली असून, सध्या तब्बल १ लाख १५ हजार ५४७ नागरिकांची तहान टँकर आणि अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून भागवावी लागत आहे.

जिल्ह्यातील पाणीस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. ९ जून रोजी ६ तालुक्यांतील ४१ गावे ४४ टँकरवर अवलंबून होती. मात्र, केवळ आठ दिवसांत मोताळा तालुक्याची भर पडत टंचाईग्रस्त तालुक्यांची संख्या ७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर टँकरची संख्या ४४ वरून ५१ झाली असून टँकरग्रस्त गावांची संख्या ४१ वरून ४८ वर गेली आहे.

Eknath Shinde Shivsena : गावचा गड जिंका, जिल्ह्याची वाट मोकळी करा!; निवडणुकांपूर्वी पक्षांची तळागाळात मोर्चेबांधणी

बुलढाणा तालुक्यात टँकरची संख्या ७ वरून ११ झाली आहे, तर चिखली तालुक्यात ४ ऐवजी ५ टँकर सुरू करावे लागले आहेत. मेहकर, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यांतील परिस्थिती अद्याप गंभीर असून पाऊस आणखी लांबल्यास संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाणीटंचाईच्या वाढत्या ताणामुळे प्रशासनाने खासगी विहिरी अधिग्रहित करण्याच्या मोहिमेला गती दिली आहे. ९ जून रोजी १२२ गावांमधील १३९ विहिरींमधून पाणीपुरवठा केला जात होता. आता हा आकडा वाढून २४५ गावांतील २७६ विहिरींपर्यंत पोहोचला आहे. मेहकर, सिंदखेड राजा, बुलढाणा आणि देऊळगाव राजा तालुक्यांमध्ये सर्वाधिक विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

Mlc election results : कुणाला 5 तर कुणाला शून्य मते; विधान परिषदेत महाविकास आघाडीची दारुण अवस्था

टंचाई निवारणासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांना वेग दिला आहे. पूर्ण झालेल्या कामांची संख्या १८९ वरून ३८५ पर्यंत वाढली असून १३९ योजना सध्या प्रगतिपथावर आहेत. याशिवाय ७५ ठिकाणी पाणीस्त्रोत बळकटीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, मान्सूनचे आगमन आणखी लांबल्यास जिल्ह्यातील पाणीस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचेही लक्ष आता आकाशाकडे लागले असून, मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा अधिकच तीव्र झाली आहे.

error: Content is protected !!