Siddharth Kharat dismisses speculation about joining Eknath Shinde’s Shiv Sena : प्रतापरावांशी वाढती जवळीक, पण ठाकरेंसोबत निष्ठा; पक्षांतराच्या चर्चा फेटाळल्या
Mehkar मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात हे अलीकडच्या काळात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये सातत्याने उपस्थित राहत असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. खरात हे शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनाही यामुळे बळ मिळत होते. मात्र, या सर्व तर्क-वितर्कांवर स्वतः आमदार खरात यांनी स्पष्ट भूमिका मांडत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
पत्रकारांनी पक्षांतराच्या चर्चांबाबत थेट प्रश्न उपस्थित केल्यानंतर खरात यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत प्रतापराव जाधव यांच्याविषयी आदर व्यक्त केला. जाधव हे माजी खासदार तसेच तीन वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असल्याने त्यांच्याबद्दल आदर असणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले.
Water crisis : मान्सूनची ओढ वाढली; बुलढाण्यात १.१५ लाख नागरिकांची तहान टँकरवर!
मात्र, वैयक्तिक संबंध आणि राजकीय भूमिका यामध्ये स्पष्ट फरक असल्याचे अधोरेखित करत, आपण आजही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी पूर्ण निष्ठावंत असून आपले नेते उद्धव ठाकरेच आहेत, असे त्यांनी ठामपणे जाहीर केले. खरात यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत सुरू असलेल्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.
तथापि, विरोधी राजकीय गटांतील नेत्यांशी वाढणारा संपर्क आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थिती यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरूच राहण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे मेहकरच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय हालचालीकडे लक्ष लागले आहे. भेटीगाठी वाढल्या की राजकीय चर्चांनाही पंख फुटतात, याचीच पुन्हा एकदा प्रचिती या निमित्ताने आली आहे.








