जुन्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित; पक्षाला पुन्हा गतवैभव मिळण्याचा आशावाद
Washim : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा राज्याच्या राजकारणात जोर धरत असतानाच आता त्याचे पडसाद जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे वाशिम जिल्ह्यातील जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. पक्षातील फूट संपून दोन्ही गट एकत्र आल्यास जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राजकीय ताकद आणि गतवैभव मिळू शकेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
एकेकाळी वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगलाच राजकीय दबदबा होता. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विविध राजकीय समीकरणांपर्यंत पक्षाची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. जिल्ह्यातील अनेक स्थानिक संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. अन्य पक्षांतील अनेक इच्छुक नेते आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असायचे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पक्षाचे स्वतंत्र स्थान निर्माण झाले होते.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदलली. पक्षाचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही विभागणी झाली. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते संभ्रमात पडले, तर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अन्य पक्षांचा मार्ग स्वीकारला. परिणामी, एकेकाळी मजबूत असलेल्या राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीला मोठा फटका बसल्याचे चित्र निर्माण झाले.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी सुनेत्रा पवारांची पडद्यामागे मोठी तयारी?
आता दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याच्या वृत्तामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही गटांतील नेते एकत्र आल्यास विखुरलेली संघटनात्मक ताकद पुन्हा एकवटता येईल. तसेच पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची संधीही निर्माण होऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
विशेष म्हणजे, आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संभाव्य विलिनीकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, विलिनीकरणाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्याने कार्यकर्त्यांना अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.
एकंदरीत, राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेकडे आता वाशिममधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आशेने पाहत आहेत. पक्षाची फूट मिटून पुन्हा एकसंध राष्ट्रवादी उभी राहणार का आणि जिल्ह्याच्या राजकारणात पक्षाला पूर्वीचे वैभव मिळणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
____








