सर्व आमदारांना फोन; २० ते २२ आमदारांच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या फोनद्वारे पक्षातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत आमदारांची मते जाणून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार विलिनीकरणाच्या दिशेने काही महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दोन्ही बाजूंच्या प्रमुख नेत्यांमध्ये वाढलेला संवाद, ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि काही आमदारांच्या हालचालींमुळे या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून गेल्या दोन दिवसांत पक्षातील आमदारांशी संपर्क साधण्यात आला. दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झाल्यास त्याबाबत आमदारांची भूमिका काय असेल, शरद पवार यांच्या गटाकडून संपर्क साधण्यात आला आहे का आणि एकत्रीकरणाचा निर्णय योग्य वाटतो का, अशा मुद्द्यांवर त्यांची मते जाणून घेतली जात असल्याचे समजते.
या घडामोडींना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानामुळे आणखी राजकीय धार मिळाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील २० ते २२ आमदार कोणत्याही क्षणी पक्षातून बाहेर पडू शकतात आणि ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. या आमदारांमध्ये पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत नाराजी असल्याचेही त्यांनी सूचित केले.
दरम्यान, शरद पवार रुग्णालयात असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा भेटण्याचे संकेत दिले होते. दुसरीकडे, पार्थ पवार यांनीही शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. ही भेट दीड तासांहून अधिक काळ चालल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
सुनेत्रा पवार यांनीही अलीकडेच विलिनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करताना ‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील,’ असे सूचक विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.
आता सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांशी साधण्यात आलेला संवाद, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीगाठी तसेच दोन्ही गटांतील नेत्यांच्या वाढत्या संपर्कामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, विलिनीकरणाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे खरोखरच एकत्रीकरण होणार की राजकीय चर्चांनाच वेगळे वळण मिळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
___








