devendra-fadnavis-sharp-jibe-at-uddhav-thackeray-resignation-statement-operation-tiger-reaction : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला
Mumbai : शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार असल्याचे वक्तव्य करणारे उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाची खिल्ली उडवत, “हे म्हणजे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो असं म्हणण्यासारखं आहे. आता राहिलाच कोणता राजीनामा? आणि ही वेळ त्यांच्यावर का आली, याचाही त्यांनी विचार करायला हवा,” असा टोला लगावला.
शिवसेनेच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील तर आपण पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देत ठाकरे यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केले.
फडणवीस म्हणाले की, शिवसेना हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आहे. हा संपत्तीचा वारसा नसून विचारांचा वारसा आहे. ज्या क्षणी त्या विचारांपासून विचलन झाले, त्याच क्षणी त्या विचारांशी बांधील असलेले अनेक कार्यकर्ते आणि नेते दूर गेले. आत्मपरीक्षण करण्याची गरज असताना ते झाले नाही आणि त्याचेच परिणाम आज दिसत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना, त्यांचा विचार आणि धनुष्यबाण आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
Dr. Rajeev potdar: पोतदार जिंकले, केदार कोंडीत; आता आमदाराचा रोख जिल्हा बँक घोटाळ्याकडे
दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तथाकथित ‘ऑपरेशन टायगर’वर भाष्य केले. पत्रकार परिषदेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदारांच्या घडामोडींविषयी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी “लवकरच मोठी बातमी मिळेल, आम्ही अर्धवट ऑपरेशन करत नाही,” असे सूचक वक्तव्य केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मध्येच हस्तक्षेप करत, “ऑपरेशन एकदम यशस्वी झाले आहे आणि बॉडीही सुखरूप आहे,” अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. मात्र या विधानामुळे ‘ऑपरेशन टायगर’बाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
पत्रकार परिषदेत विरोधकांनी सरकारच्या चहापान कार्यक्रमावर टाकलेल्या बहिष्कारावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निशाणा साधला. विरोधकांनी दिलेले बहिष्काराचे पत्र कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या मदतीने तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांनी विधायक भूमिका घेतली तर सरकार पूर्ण सहकार्य करेल, मात्र केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील विरोधकांवर टीका करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. संवेदनशील परिस्थितीत व्यक्तींवर वैयक्तिक टीका करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. सकाळी टीका आणि रात्री समेटाचा प्रयत्न अशी विरोधकांची भूमिका असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांमध्ये “केमिकल लोचा” असल्याची मिश्कील टिप्पणी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या वर्धापन दिनाच्या भाषणात भाजप, शिंदे गट आणि पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर टीका करताना, नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत असतील तर आपण पद सोडण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र त्यावरून आता सत्ताधारी महायुतीने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात याच मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.








