shivsena-operation-tiger-four-mps-still-silent-no-official-announcement-yet : बहुचर्चित ऑपरेशन टायगरची घोषणा रखडली
Mumbai : ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा रंगून आता सहा दिवस उलटले असले, तरी ‘ऑपरेशन टायगर’ची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. दोन खासदारांनी सार्वजनिकरीत्या आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी उर्वरित चार खासदार नेमके कुठे आहेत आणि ते अधिकृतपणे आपला निर्णय कधी जाहीर करणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिंदे गटाकडून सुरुवातीपासूनच ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. लोकसभा अध्यक्षांकडे आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, छायाचित्रे तसेच खासदारांचे व्हिडिओ पुरावे सादर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर स्वतंत्र गट स्थापन झाल्याची घोषणा लवकरच होईल, असे संकेत देण्यात आले होते. मात्र रविवार उलटूनही कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने या संपूर्ण घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा अध्यक्षांकडे पाच खासदारांचा एक स्वतंत्र व्हिडिओ आणि एका खासदाराचा वेगळा व्हिडिओ उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. हे व्हिडिओ अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नेमकी अडचण कुठे निर्माण झाली आहे, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सोमवारी तरी या संदर्भातील पुरावे सादर केले जातील का आणि स्वतंत्र गटाच्या मान्यतेबाबत काही निर्णय जाहीर होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आपली भूमिका स्पष्ट केली. विकासकामांना गती देण्यासाठी आणि मतदारसंघाच्या हितासाठी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पवनसिंह निंबाळकर प्रकरणाचाही उल्लेख केला. निवडणुकीचा निकाल प्रतिकूल गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचा दावा देखील त्यांनी केला.
राजकीय चर्चांमध्ये सध्या ठाकरे गटातील संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील या सहा खासदारांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. यापैकी दोन खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर उर्वरित चार खासदारांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Devendra fadnavis : ‘उजाडलेल्या गावाची पाटीलकी सोडतो म्हणण्यासारखं’ ऑपरेशन टायगरवरही मोठं वक्तव्य
ऑपरेशन टायगरची अधिकृत घोषणा होत नसल्याने या राजकीय घडामोडींमागे नेमके काय सुरू आहे, याबाबत सस्पेन्स कायम आहे. पुढील काही दिवसांत लोकसभा अध्यक्षांची भूमिका, पुराव्यांची अधिकृत नोंद आणि खासदारांची सार्वजनिक भूमिका यावरून महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील समीकरणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.








