Credit war erupts even before the Trauma Centre becomes operational in Mehkar : केंद्र सुरू होण्यापूर्वीच श्रेयवादाची लढाई; मेहकरच्या राजकारणात नवा वाद
Mehkar येथील ट्रॉमा केअर सेंटरसाठी आवश्यक पदनिर्मितीला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर तालुक्यातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयानंतर सुविधेपेक्षा त्याच्या श्रेयावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
निर्णय जाहीर होताच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देत, आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याचा दावा केला. दुसरीकडे, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनीही हा निर्णय आपल्या प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगत श्रेयाचा दावा केला. त्यामुळे ट्रॉमा सेंटरच्या पदनिर्मितीच्या निर्णयापेक्षा त्याचे श्रेय नेमके कुणाला द्यायचे, यावरच राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
दोन्ही नेत्यांचे समर्थकही आपल्या-आपल्या भूमिकेचे समर्थन करताना दिसत आहेत. काही जण शासनाकडे पाठविलेल्या पत्रव्यवहाराचे दाखले देत आहेत, तर काही विविध बैठका, मंत्रीस्तरीय पाठपुरावा आणि प्रशासकीय स्तरावरील प्रयत्नांचा उल्लेख करून आपल्या नेत्याची भूमिका अधोरेखित करत आहेत. त्यामुळे सामाजिक माध्यमांपासून राजकीय वर्तुळापर्यंत श्रेयवादाचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
Prakash Ambedkar : जात कळेपर्यंत अभिजीत दीपके ‘जेन-झी’चे ‘डार्लिंग’ होते; प्रकाश आंबेडकरांचा दावा
मात्र, या सर्व घडामोडींमध्ये सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा वेगळी आहे. ट्रॉमा सेंटरसाठी मंजूर झालेल्या पदांवर डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी प्रत्यक्षात कधी नियुक्त होणार आणि रुग्णांना अत्यावश्यक सेवा कधी उपलब्ध होणार, याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Uday Samant : ‘आता सगळं गेल्यानंतर विदर्भात फिरून काय मिळणार?’, उदय सामंतांचा टोला
राजकीय श्रेयवाद सुरू असला तरी नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रॉमा सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणे. श्रेय कुणालाही मिळो, परंतु रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे आणि आरोग्य सुविधा सक्षम होणे, हीच जनतेची खरी अपेक्षा असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.








