Prakash Ambedkar claims that Abhijeet Deepke was the “darling” of Gen Z until his caste identity became known : स्मार्ट मिटरवरून सरकारवर जोरदार टीका, जातीय राजकारणावर केले भाष्य
Akola ‘काॅक्रोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दीपके यांची जात माहिती नव्हती, तोपर्यंत ते ‘जेन-झी’ पिढीचे ‘डार्लिंग’ झाले होते. मात्र ते शूद्र असल्याचे समजल्यानंतर सवर्ण समाजाने त्यांची साथ सोडली, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी केला.
अकोल्यात माध्यमांशी संवाद साधताना आंबेडकर म्हणाले की, अभिजीत दीपके शूद्र असल्याची जाणीव झाल्यानंतर सवर्ण समाजाने त्यांच्यापासून अंतर ठेवले. त्यामुळे दिल्लीतील त्यांचा मोर्चा अयशस्वी ठरला. या घटनेतून आजच्या युवा पिढीमध्ये जातीय विचार किती खोलवर रुजले आहेत, हे स्पष्ट होते. प्रश्नांपेक्षा जातीला महत्त्व देण्याची ‘जेन-झी’ची मानसिकता देशाला विघटनाच्या दिशेने नेत असून, त्याचा राजकीय लाभ भाजपला होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्मार्ट मीटर बसविण्याचे कंत्राट मिळालेल्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला कोणती मदत केली, याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर करावी, अशी मागणीही ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
Uday Samant : ‘आता सगळं गेल्यानंतर विदर्भात फिरून काय मिळणार?’, उदय सामंतांचा टोला
ते म्हणाले की, वीज ग्राहक दरमहा मीटरचे भाडे भरत आहेत. तसेच ‘वन टाइम’ तीन हजार रुपये भरल्यानंतरही आता स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात आहे. जुने मीटर नादुरुस्त झाले आहेत का, याचा खुलासा सरकारने करावा. स्मार्ट मीटरमुळे वीज वापर नसतानाही बिल येण्याची शक्यता असून, जुन्या बिलांच्या तुलनेत ८ ते १० टक्के अधिक भार ग्राहकांवर पडू शकतो, असा आरोप त्यांनी केला.
ग्राहकांनी स्वतःच्या हितासाठी स्मार्ट मीटरला विरोध करावा, असे आवाहन करत त्यांनी या विरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, मनपा गटनेते नीलेश देव आदी उपस्थित होते.
Uddhav thackeray : फितुरांच्या फितुरीला जशास तसे उत्तर मिळणार, उद्धव यांचे विदर्भातून आव्हान
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वीज मीटर नादुरुस्त असल्यासच ते बदलता येते. ग्राहकाची संमती किंवा नाहरकत न घेता केवळ सक्तीने मीटर बदलता येत नाही. त्यामुळे मीटर बदलण्यासाठी ग्राहकांना नोटीस देण्याचा अधिकार संबंधित यंत्रणेला नसल्याचा दावा ॲड. आंबेडकर यांनी केला.
अकोला शहरात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र ग्राहकाची परवानगी न घेता जबरदस्तीने मीटर बदलल्यास तो मीटर चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करावी, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले.








