व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ncp sharad pawar : शरद पवार गटात अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना उधाण

Ncp sharad pawar : शरद पवार गटात अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना उधाण

ncp-sharad-pawar-group-internal-rift-congress-merger-nda-political-crisis-maharashtra : काँग्रेसमध्ये विलिनीकरण की एनडीएची वाट, राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह?

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अंतर्गत मतभेद वाढत असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या पक्षातही दोन वेगवेगळे मतप्रवाह तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षात काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावे की राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए सोबत जाण्याचा पर्याय स्वीकारावा, यावरून अंतर्गत पातळीवर मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील एका गटाचे मत असे आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करावा. महाविकास आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी हा पर्याय योग्य ठरू शकतो, असे या गटाचे मत असल्याचे सांगितले जात आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या संघटन कौशल्याची छाप; ‘मन की बात’साठी बल्लारपूरचा शंभर टक्के बूथ पॅटर्न

दुसरीकडे, पक्षातील काही नेत्यांची भूमिका मात्र वेगळी असल्याची चर्चा आहे. लोकसभा आणि राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर एनडीएमध्ये सहभागी होण्याचा पर्याय खुला ठेवावा, अशी भूमिका या गटाकडून मांडली जात असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या खासदारांची संख्या आणि राजकीय ताकद लक्षात घेता एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास त्याचा विचार व्हावा, अशी भावना काही नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर एनडीएसोबत राहण्याचा विचार यापूर्वीही व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे तो विषय मागे पडला. आता पुन्हा एकदा एनडीएचा पर्याय चर्चेत आल्याने पक्षातील अंतर्गत समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षातील काही लोकप्रतिनिधींना विरोधी पक्षात राहिल्यामुळे मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावताना अडचणी येत असल्याची भावना असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांसोबत समन्वय नसल्यामुळे निधी आणि प्रशासकीय कामांमध्ये अडथळे येत असल्याची चर्चा पक्षाच्या अंतर्गत बैठकींमध्ये होत असल्याचे सांगितले जात आहे.

Nagpur municipal corporation : सर्वपक्षीय एकमत; नगरसेवकांना आता ३५ लाखांचा वॉर्ड निधी

याच पार्श्वभूमीवर आगामी काळात शरद पवार कोणती भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षात राहण्याची भूमिका कायम ठेवली तर पक्षातील काही आमदार किंवा पदाधिकारी वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशीही राजकीय चर्चा सुरू आहे. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अशा सर्व चर्चांचे खंडन करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकसंध असल्याचा दावा केला आहे. पक्षातील एकही आमदार फुटणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या या सर्व घडामोडी अधिकृत निर्णय किंवा घोषणेशिवाय केवळ राजकीय चर्चांच्या आणि सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुढील राजकीय दिशा काय असेल, अंतर्गत मतभेदांवर पडदा पडेल की मोठा निर्णय घेतला जाईल, याचे उत्तर आगामी काळातील पक्षाच्या भूमिकेतून स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!