व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sharad Pawar : शरद पवार गटातील आमदारांचा सत्तेत जाण्यासाठी दबाव वाढला?

Sharad Pawar : शरद पवार गटातील आमदारांचा सत्तेत जाण्यासाठी दबाव वाढला?

sharad-pawar-ncp-mla-pressure-to-join-nda-sunetra-pawar-jayant-patil-fadnavis : ‘निर्णय घ्या, अन्यथा आम्ही वेगळी भूमिका घेऊ’; एनडीए प्रवेशाबाबत चर्चांना वेग

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर हालचाली वेगाने सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षातील बहुसंख्य आमदार आणि काही खासदारांनी भाजपप्रणित एनडीए आणि महायुतीसोबत जाण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मतदारसंघांच्या विकासासाठी सत्तेचा भाग होणे अपरिहार्य असल्याचे मत अनेक आमदारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील काही आमदारांनी वरिष्ठ नेतृत्वाला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतला नाही, तर आम्हाला स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल. त्यावेळी वाईट वाटून घेऊ नका.” या भूमिकेमुळे पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आल्याची चर्चा आहे.

विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील पक्षाचे चारही आमदार विरोधी बाकांवर असल्यामुळे विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करत आहेत. पुढील निवडणुकीला मतदारांसमोर विकासकामांचा अहवाल ठेवायचा असेल, तर सत्तेचा भाग होणे गरजेचे असल्याचे त्यांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे.

या आमदारांनी अजित पवार यांच्याबाबतही भूमिका मांडल्याचे समजते. अजित पवार हे पूर्वी आपल्या पक्षाचेच नेते असल्याने त्यांच्याकडे विकासनिधीसाठी सहजपणे जाता येत होते. मात्र, वेगळा राजकीय मार्ग स्वीकारल्यानंतर परिस्थिती बदलली असून आता सत्तेत नसल्यामुळे विकासकामांसाठी अडचणी निर्माण होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात वित्त खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे गेली, तरी विरोधी पक्षातील आमदारांना प्राधान्याने निधी मिळेल, अशी अपेक्षा ठेवणे कठीण असल्याचेही काही आमदारांचे मत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Jayant Patil :’वर्षा’वर महा बैठक जयंत पाटील-फडणवीस यांच्यात ‘सविस्तर’ चर्चा

दरम्यान, शरद पवार गटाने एनडीएमध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यासाठी एक महत्त्वाची अटही समोर आल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून एनडीएचा भाग बनण्याचा मार्ग स्वीकारला, त्याच धर्तीवर शरद पवार गटातील खासदारांनीही सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यानंतर एनडीएत सहभागी व्हावे, अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मांडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या राजकीय घडामोडींमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयांनी ही भेट उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणात अपात्र ठरविण्यात आल्याच्या विषयासंदर्भात झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही अपात्रता योग्य नसल्याची भूमिका मांडण्यासाठीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांना दुर्गराज रायगडावरून निमंत्रण, ‘शिवसन्मान-२०२६’ने गौरवणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील वाढती अस्वस्थता, सत्तेत सहभागी होण्याबाबत आमदारांचा वाढता दबाव आणि एनडीएमध्ये प्रवेशासंदर्भातील चर्चांमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या चर्चांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात पक्ष कोणता निर्णय घेतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!