Restrictions imposed on collective campaigning by panels in the Vanchit Pradesh Executive Committee elections : वंचित प्रदेश कार्यकारिणी निवडणूकीत पॅनलच्या सामूहिक प्रचारावर निर्बंध
Akola वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी निवडणुकीत प्रदेशाध्यक्षपदाच्या उमेदवारासोबत सदस्यपदाच्या उमेदवारांचे पॅनल तयार करून संयुक्त प्रचार करण्यास केंद्रीय निवडणूक समितीने मनाई केली आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी पक्षाच्या अधिकृत समाजमाध्यम पेजवर पत्र प्रसिद्ध करून सर्व संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सध्या प्रदेश कार्यकारिणीच्या निवडणुकीत सदस्यपदासाठी २५ तर प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक उमेदवाराचा सूचक आणि अनुमोदक स्वतंत्र असावा, असे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रदेशाध्यक्षपदाच्या एका उमेदवाराच्या समर्थनार्थ सदस्यपदाच्या काही उमेदवारांचे पॅनल तयार करून प्रचार सुरू असल्याचे तसेच काही जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान पदाधिकारी अशा पॅनलला पाठिंबा दर्शविणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसारित करत असल्याचे समितीच्या निदर्शनास आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अशा प्रकारच्या पॅनल प्रचारामुळे सर्व उमेदवारांना समान संधी मिळण्याच्या तत्त्वाला बाधा पोहोचू शकते. सर्व प्रदेशाध्यक्षपदाच्या उमेदवारांना समान स्वरूपाचे पॅनल उभे करण्याची व्यावहारिक संधी उपलब्ध नसल्याने निवडणूक प्रक्रियेत असमतोल निर्माण होण्याची शक्यता असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रदेशाध्यक्षपदाच्या उमेदवारासोबत सदस्यपदाच्या उमेदवारांचे पॅनल तयार करून प्रचार करू नये, पॅनलच्या स्वरूपातील पोस्टर, समाजमाध्यमांवरील पोस्ट किंवा इतर प्रचार साहित्य तातडीने हटवावे, तसेच जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही गटाला किंवा पॅनलला पाठिंबा असल्याचा आभास निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी दिले आहेत.
Jal Jeevan Mission : राज्यातील ७५ टक्के पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्णच
केंद्रीय निवडणूक समितीने जारी केलेल्या पत्रात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर तसेच आंबेडकर कुटुंबीयांनी कोणत्याही पॅनल किंवा उमेदवाराला अधिकृत पाठिंबा दिलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि स्वच्छ वातावरणात पार पडावी, हीच त्यांची भूमिका असल्याचे नमूद करण्यात आले असून, सुजात आंबेडकर यांच्या नावाने कोणत्याही उमेदवाराला किंवा पॅनलला पाठिंबा असल्याचा प्रचार करू नये, असेही समितीने स्पष्ट केले आहे.








