28 nominations rejected in the District Bank election; final picture to emerge only after the withdrawal process : डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बिनविरोध निवड निश्चित?; उर्वरित २० जागांसाठी चुरस
Buldhana जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नामांकन अर्जांच्या छाननीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दाखल झालेल्या २९८ नामांकन अर्जांपैकी २८ अर्ज छाननीदरम्यान बाद करण्यात आले. पात्र ठरलेल्या २७० अर्जांपैकी एका अर्जाची माघार घेतल्याने सध्या २६९ नामांकन अर्ज शिल्लक आहेत. मात्र, काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्यामुळे ही संख्या प्रत्यक्ष उमेदवारांची नसून अर्जांची आहे.
छाननीत अपात्र ठरलेल्या इच्छुकांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम १५२ अन्वये अमरावती येथील विभागीय सहनिबंधकांकडे अपील करण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अपील प्राधिकरणाने छाननी अधिकाऱ्यांचा निर्णय चुकीचा ठरविल्यास संबंधित अर्ज पुन्हा वैध ठरू शकतो. त्यामुळे अंतिम अर्जसंख्येत बदल होण्याची शक्यता कायम आहे.
नियमांनुसार, आवश्यक पात्रता पूर्ण करणारा उमेदवार एकापेक्षा अधिक मतदारसंघांतून निवडणूक लढवू शकतो. यासाठी संबंधित मतदारयादीत नाव असणे, थकबाकीदार नसणे तसेच राखीव प्रवर्गासाठी आवश्यक प्रमाणपत्रांसह सर्व निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ११ ऑगस्ट असून, अंतिम उमेदवारांची यादी १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान २३ ऑगस्टला, तर मतमोजणी २४ ऑगस्टला होणार आहे. माघारीची मुदत संपेपर्यंत राजकीय समझोते, मनधरणी आणि पडद्यामागील हालचालींना वेग येण्याची शक्यता असल्याने सहकार क्षेत्राचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे.
दरम्यान, सिंदखेडराजा प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था (सोसायटी) मतदारसंघातून माजी मंत्री तथा ज्येष्ठ सहकार नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दत्ताराव देशमुख (रा. राहेरी) यांनी मंगळवारी (२८ जुलै) उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला. अधिकृत घोषणा निवडणूक कार्यक्रमानुसार होणार असली, तरी या मतदारसंघात निवडणूक बिनविरोध झाली आहे.
डॉ. शिंगणे यांच्या बिनविरोध निवडीनंतर आता उर्वरित २० संचालकपदांसाठी कोणती राजकीय समीकरणे जुळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सहकारातील सर्वपक्षीय समन्वयाचा फॉर्म्युला चर्चेत असला, तरी अंतिम चित्र उमेदवारी माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.








