व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Manoj Jarange : बावनकुळेंच्या सांगण्यावरून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द?

Manoj Jarange : बावनकुळेंच्या सांगण्यावरून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द?

manoj-jarange-allegation-on-chandrashekhar-bawankule-over-kunbi-certificates-maratha-reservation-row : मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल

Mumbai : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्य सरकार आणि सत्ताधारी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रालयातून मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे पद्धतशीरपणे रद्द केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून बीड जिल्हाधिकाऱ्यांना मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्याबाबत पत्र देण्यात आल्याचा दावाही जरांगे यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुतीतील मराठा समाजाच्या नेत्यांवरही टीका केली. एका बावनकुळे यांच्यामुळे फडणवीस सरकार अडचणीत येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठवाड्यातील अनेकांना देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्याचा फटका काही नगरसेवकांनाही बसणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. हे सर्व महायुती सरकारच्या सांगण्यावरून सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणाला मूकसंमती असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नाराजी व्यक्त केली.
“एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत दुहेरी भूमिका घेतली. आम्ही त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली, मात्र आता मराठा समाजाचे नुकसान होत असेल तर कोणालाही सोडणार नाही. स्वतःला मराठ्यांचे नेते म्हणवून घेणारे लोक आता गप्प का आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मराठा समाजाचे नुकसान करणाऱ्या आमदारांना आगामी निवडणुकांमध्ये पराभूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Sunetra Pawar : प्रशांत किशोर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी अचानक भेट

या संपूर्ण प्रकरणामागे भाजप नेत्यांची मूकसंमती असल्याचा आरोप करत जरांगे म्हणाले की, “यासंदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरही ही बाब घातली होती, मात्र त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. आमच्याकडे सर्व पुरावे असूनही कागदपत्रांच्या नोंदी सापडल्यानंतर काहींना बोगस ठरवले जात आहे. दोन सख्या भावांपैकी एकाला कुणबी प्रमाणपत्र दिले जाते, तर दुसऱ्याचे अर्ज फेटाळले जात आहेत. प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे.”
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, “विखे पाटील यांच्यामुळे आम्ही यापूर्वी सरकारसोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता मराठा समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला जात असल्याचे दिसत आहे.” तसेच, “माझा घात होऊ शकतो, असे मी उदय सामंत यांना आधीच सांगितले होते,” असा दावाही त्यांनी केला.
समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत दोन-चार लोकांसाठी राज्यातील अनेक जागांवर परिणाम घडवून आणण्याची ताकद आमच्यात आहे, असा गर्भित इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा रणशिंग फुंकले आहे.

error: Content is protected !!