tukaram-mundhe-fda-action-ayurvedic-companies-license-cancelled-10-companies : ४३४ संस्थांची तपासणी, १० कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द
Mumbai : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या कारभारावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. औषधांची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया आणि सुरक्षिततेसंदर्भातील नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या १० आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर राज्यभरात राबविण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेत ही कारवाई करण्यात आली.
राज्यातील तब्बल ४३४ परवानाधारक आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या कारखाना परिसरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत औषध उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छता, आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, औषधांच्या चाचणीच्या नोंदी, प्रमाणित कार्यपद्धती आणि उत्पादनांवरील लेबल यांसह विविध बाबींची कसून पडताळणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळून आलेल्या १३५ आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळलेल्या १० संस्थांविरोधात कठोर पाऊल उचलत त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
Shivsena symbol : निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या वैधतेवरच गंभीर प्रश्न !
एफडीएच्या कारवाईत पुढील १० संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. १. मे. कृष्णा हर्बल – बारामती, पुणे – २. मे. लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स – करंजा, गोंदिया – ३. मे. आदित्य फार्मा – वडेगाव, तिरोडा, गोंदिया – ४. मे. अंगरस आयुर्वेद – वडेगाव, तिरोडा, गोंदिया – ५. मे. कालिदास गांधी – पुणे – ६. मे. शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी – सिन्नर, नाशिक – ७. मे. इंडुकेअर फार्मा प्रा. लि. – जेजुरी एमआयडीसी, पुरंदर, पुणे – ८. मे. हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर – अमरावती – ९. मे. हिलॅरियस आयुर्वेद – एमआयडीसी मुंडीपार, गोंदिया – १०. मे. यशोदा लॅब प्रा. लि. – नाशिक रोड, नाशिक
एफडीएच्या तपासणीदरम्यान काही संस्थांमध्ये औषध उत्पादनाशी संबंधित गंभीर अनियमितता आढळून आल्या. मान्यताप्राप्त तांत्रिक व्यक्ती अनुपस्थित असतानाही औषधांचे उत्पादन सुरू असल्याचे काही ठिकाणी आढळले. औषधांची निर्मिती आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी आवश्यक तांत्रिक व्यवस्थेच्या बाबतीतही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
काही उत्पादन केंद्रांमध्ये गुणवत्ता नियंत्रण विभागाची पुरेशी व्यवस्था नसल्याचे आढळले. तसेच औषधांच्या चाचणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याचेही तपासणीत समोर आले. उत्पादन परिसरातील स्वच्छतेच्या बाबतीतही काही संस्थांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याशिवाय औषधांच्या लेबलवर चुकीच्या उत्पादन तारखा छापल्यासारख्या गंभीर बाबीही तपासणीदरम्यान निदर्शनास आल्या.
कच्चा माल आणि तयार औषधांच्या चाचणीशी संबंधित अभिलेख उपलब्ध नसणे, मास्टर फॉर्म्युला रेकॉर्डचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी व्यवस्थित न ठेवणे, अशा त्रुटीही आढळून आल्या. औषधांमध्ये भेसळ किंवा एकमेकांत घटक मिसळण्याचा धोका टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रॉस-कंटॅमिनेशन प्रतिबंधक कार्यपद्धतींचा अभाव असल्याचेही काही ठिकाणी समोर आले.
आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करताना औषधांची गुणवत्ता आणि नागरिकांची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य असणे आवश्यक आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० तसेच त्याअंतर्गत शेड्युल टीमध्ये नमूद करण्यात आलेल्या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसच्या नियमांचे पालन करणे औषध उत्पादकांसाठी बंधनकारक आहे.
या नियमांचे गंभीर उल्लंघन करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही औषध उत्पादक संस्थेची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर करण्यात आलेल्या या धडक तपासणीमुळे आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांमध्ये खळबळ उडाली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर भविष्यातही अशीच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.








