Krishna Khopde enters the Tiwari-Gudhe dispute:काँग्रेसच्या कारभारावर खोपडेंचा घणाघात; ‘५० वर्षांच्या सत्तेत काय विकास केला?’
Nagpur : भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्यातील वाद आता चांगलाच टोकाला गेला असून, यात पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी उडी घेतली आहे. गुडधेंनी भूतकाळातील मुद्द्यांचा आधार घेत केलेल्या टीकेला उत्तर देताना खोपडे यांनी, १८ वर्ष तुमचे तोंड कोणी बंद केले होते असा सवाल करत प्रफुल गुडधेंना विकासाच्या मुद्द्यावर समोरासमोर चर्चेचे खुले आव्हान दिले आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्यामध्ये त्यांनी पैसे मोजण्याच्या कृतीतून भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्याकडे अप्रत्यक्ष इशारा केला होता. यावर तीव्र आक्षेप घेत तिवारी यांनी गुडधेंनी माफी मागावी, अन्यथा अवमान याचिका दाखल केली जाईल, असा इशारा दिला होता. या संपूर्ण वादात गुडधे यांनी आमदार कृष्णा खोपडे यांच्या स्थायी समितीच्या कार्यकाळाचाही संदर्भ दिला होता. यावर आता कृष्णा खोपडे यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला आहे.
खुलासा करताना आ. कृष्णा खोपडे म्हणाले की, ते २००८ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असताना नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता सन २००८-२००९ चे अंदाजपत्रक सभागृहात सादर केले होते. त्यावेळी आजचे काँग्रेस अध्यक्ष आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रफुल गुडधे यांनी या बजेटला विरोध दर्शवण्याऐवजी त्याचे स्वागत करून अभिनंदन केले होते. याच मुद्द्यावरून खोपडे यांनी, तब्बल १८ वर्षानंतर आज त्यांना नेमकी कोणती सद्बुद्धी सुचली असा उपरोधिक सवाल केला आहे. तसेच, अध्यक्षपदावर बसल्यावर अनाप-शनाप आरोप करणे हीच काँग्रेसची संस्कृती बनल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेसच्या कारभारावर ताशेरे ओढताना खोपडे म्हणाले की, नागपूरच्या जनतेने काँग्रेसला ५० वर्षे केंद्र, राज्य आणि म.न.पा. मध्ये सत्ता दिली. त्यांचे नेते मंत्री झाले, काँग्रेस अध्यक्षांचे गुरु २५ वर्षे आमदार व १३ वर्षे मंत्री राहिले; परंतु त्यांनी विकासाचे कोणते सुवर्ण अक्षरांनी लिहावे असे काम केले, ते सांगावे. काँग्रेसच्या नेत्यांनी डी.एड., बी.एड., मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजसाठी सरकारी जागा बळकावून स्वतःची दुकाने सुरू केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मात्र आपण तसे न करता त्या जागी मोठे प्रकल्प आणल्याचे सांगत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने पूर्व नागपूरचा चेहरामोहरा बदलल्याचे खोपडे यांनी नमूद केले.
नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीचा दाखला देत खोपडे म्हणाले की, निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आणि मनपा विरोधी पक्षनेत्यामध्येच जुंपली होती. त्यानंतर अनेक नगरसेवकांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकत विकासाच्या नावावर भाजपला साथ दिली. यावर काँग्रेसने कधीही आत्मपरीक्षण किंवा मंथन केले नाही. स्वतःचे नगरसेवक सांभाळता येत नाहीत, पण दुसऱ्यांना बिनमागितलेला सल्ला देण्याचे काम काँग्रेसचे अध्यक्ष करीत आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. अखेरीस, शिक्षणात कमी असलो तरी विकासात कुठेही मागे नाही; हिंमत असेल तर विकासाच्या मुद्द्यावर समोरासमोर चर्चा करावी, असे थेट आव्हान आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रफुल गुडधे यांना दिले आहे.








