40 Nagpur BJP corporators face action for skipping CM’s event; show-cause notices and funds likely to be withheld : निमंत्रण आणि स्मरणपत्रे देऊनही ४० नगरसेवक गैरहजर; पक्षशिस्तीचा भंग केल्याची गंभीर दखल
Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाला कोणतीही पूर्वकल्पना किंवा कारण नसताना दांडी मारणाऱ्या नागपूर शहरातील भाजपच्या तब्बल ४० नगरसेवकांना पक्षाने दणका दिला आहे. या सर्व गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांना पक्षाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या नगरसेवकांचा विकास फंड किंवा प्रभागातील निधी रोखण्याचे निर्देशही महापालिकेतील सत्तापक्ष नेत्यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातील रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात दिव्यांग बांधवांना साहित्य वितरणाचा एक मोठा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. राज्याच्या कामाव्यतिरिक्त नागपूरवर विशेष प्रेम असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढला होता. नागपूरचा हा कार्यक्रम असल्याने मुख्यमंत्री आदल्या दिवशी रात्री तब्बल दोन वाजता शहरात दाखल झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता थेट भट सभागृहात कार्यक्रमासाठी उपस्थित झाले.मात्र, खुद्द त्याच शहरात आणि अवघ्या काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला पाठ फिरवली. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणे किंवा त्यांना भेटण्याचे साधे सौजन्यही या नगरसेवकांनी दाखवले नाही, याची पक्षाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे.
महापालिकेतील भाजपचे सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी या सर्व १०२ नगरसेवकांना कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवून उपस्थित राहण्याची सक्त सूचना दिली होती. एवढेच नव्हे, तर स्मरणपत्रेही पाठवण्यात आली होती. असे असतानाही तब्बल ४० नगरसेवक कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. यामध्ये काही बडे नगरसेवक आणि माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते. या सर्व ४० जणांची यादी जरी सार्वजनिक करण्यात आली नसली, तरी सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी ती स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी यांच्याकडे सोपवली आहे.
या नगरसेवकांवर अत्यंत कडक शिस्तीची कारवाई करताना बोरकर यांनी, स्थायी समितीमार्फत संबंधित नगरसेवकांच्या प्रभागांना निधी किंवा फंड वितरित करण्यापूर्वी या अनुपस्थितीचा जाब विचारला जावा आणि त्यांची नावे तपासूनच निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आणि आमदारांच्या मागे-पुढे फिरणारे हेच लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कार्यक्रमालाच दांडी मारत असतील, तर पक्षशिस्तीचा मोठा प्रश्न निर्माण होतो, असा संताप स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा आयुर्वेदिक औषध कंपन्यांवर दणका!
मुख्यमंत्री कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर असा लांब प्रवास करून रात्री उशिरा शहरात पोहोचतात आणि स्थानिक नगरसेवकांना त्यांच्या स्वागताला व कार्यक्रमाला येण्यासाठी वेळ मिळत नाही, हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम सत्तापक्ष नेत्याने भरला आहे. आता या ४० नगरसेवकांवर भाजप पक्षश्रेष्ठी नेमकी काय कायदेशीर किंवा संघटनात्मक कारवाई करतात, याकडे संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








