Conservation of Lonar Lake gets a boost; ₹42.79 crore fund sanctioned : विकास आराखड्यातील कामांसाठी निधी; अमरावतीच्या विभागीय आयुक्तांकडे संनियंत्रणाची जबाबदारी
Amravati जागतिक स्तरावर ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि पर्यावरणीय महत्त्व असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या संरक्षण, संवर्धन आणि विकासाला राज्य शासनाने आर्थिक बळ दिले आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन आणि विकास आराखड्यांतर्गत विविध कामांसाठी ४२.७९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी सुरुवातीला ३६९.७८७७ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर प्रकल्पाची व्याप्ती आणि प्रस्तावित कामांचे महत्त्व लक्षात घेऊन हा आराखडा वाढविण्यात आला. शासन निर्णयानुसार ४३४.६१७७ कोटी रुपयांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या विकास आराखड्यांतर्गत आतापर्यंत एकूण १३३.१२ कोटी रुपयांचा निधी विविध टप्प्यांत वितरित करण्यात आला आहे.
विभागीय आयुक्तांकडे संनियंत्रणाची जबाबदारी
सध्याच्या आर्थिक वर्षातील विकासकामांसाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. नयना गुंडे यांनी शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सन २०२६-२७ या वर्षासाठी ४२.७९ कोटी रुपयांचा निधी अमरावतीच्या विभागीय आयुक्तांकडे वितरित केला आहे. संपूर्ण प्रकल्पाचे संनियंत्रण अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. गुंडे काम पाहणार आहेत. याबाबत नियोजन विभागाच्या अवर सचिव मनीषा सावंत यांनी १४ ऑगस्ट रोजी शासनादेश जारी केला आहे.
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात आता मुख्यमंत्रीच बिग बॉस; नव्या अधिसूचनेमुळे महायुतीत खळबळ
या कामांना मिळणार प्राधान्य
लोणार सरोवर आणि परिसराचा विकास करताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्यात येणार आहे. सरोवरात येणारे नैसर्गिक पाण्याचे स्रोत मोकळे करणे, दूषित पाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, पर्यटकांसाठी पादचारी मार्ग व माहिती केंद्र उभारणे, आकर्षक प्रकाशयोजना करणे तसेच विवर परिसराची सुरक्षितता वाढविणे, अशा कामांचा त्यात समावेश आहे.
याशिवाय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत विवर परिसरातील प्राचीन हेमाडपंथी मंदिरांचे जतन व पुनर्संचयन, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, रस्ते सुधारणा आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणारे विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
उल्कापातातून निर्माण झाले लोणार सरोवर
लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातामुळे बेसाल्ट खडकात मोठे विवर निर्माण झाले आणि कालांतराने त्यात सरोवराची निर्मिती झाली. या विवराचा व्यास सुमारे १.८ किलोमीटर आहे.
OBC Reservation : १५ जिल्ह्यांतील ओबीसी आरक्षणाला कात्री; खुल्या प्रवर्गातील पदे वाढली
बेसाल्ट खडकातील हे विवर असल्याने लोणार सरोवराला विशेष वैज्ञानिक महत्त्व प्राप्त झाले आहे. देश-विदेशातील विविध संशोधन संस्थांनी सरोवराच्या भूगर्भीय, पर्यावरणीय आणि जैवविविधतेशी संबंधित वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये लोणार सरोवराला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला. त्यामुळे या परिसराच्या संवर्धनाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.








