OBC reservation cut in 15 districts; number of seats in the open category increased : सरपंच आरक्षणात मोठा बदल; ५० टक्क्यांची मर्यादा कायम ठेवण्यासाठी पुनर्रचना
Akola आरक्षणाची ५० टक्क्यांची कमाल मर्यादा कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने १५ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणात मोठा बदल केला आहे. ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या शुद्धीपत्रकानुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि खुल्या प्रवर्गातील सरपंच पदांच्या संख्येत फेरबदल करण्यात आला आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार निश्चित असल्याने त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
राज्य निवडणूक आयोगाने २३ जुलै २०२६ रोजी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला. यापूर्वी ओबीसी प्रवर्गासाठी राज्यभरात ६,७१९ सरपंच पदे, त्यापैकी ३,३७३ पदे महिलांसाठी निश्चित करण्यात आली होती. सुधारित आरक्षणानुसार ओबीसी प्रवर्गातील पदांची संख्या ६,२०७ झाली असून, त्यापैकी ३,१११ पदे महिलांसाठी आहेत.
दुसरीकडे, खुल्या प्रवर्गातील सरपंच पदांची संख्या १३,०७७ वरून १३,५८९ झाली आहे. यातील ६,८०३ पदे महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील ५१२ पदे कमी होऊन ती खुल्या प्रवर्गात समाविष्ट झाली आहेत.
Hussain Dalwai : ‘एकनाथ शिंदे यांची पहिली पसंती काँग्रेस होती, मात्र आमच्याच नेत्यांचा विरोध होता ‘
१५ जिल्ह्यांत आरक्षणाची पुनर्रचना
धुळे, जळगाव, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या १५ जिल्ह्यांतील सरपंच पदांच्या आरक्षणाची पुनर्रचना करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाऊ नये, यासाठी ओबीसी प्रवर्गातील पदे कमी करून खुल्या प्रवर्गातील पदे वाढविण्यात आली आहेत.
५१२ ओबीसी पदे कमी
सुधारित आरक्षण रचनेनुसार ओबीसी प्रवर्गातील सरपंच पदांची संख्या ५१२ ने घटली, तर खुल्या प्रवर्गातील पदे तेवढ्याच संख्येने वाढली आहेत. ओबीसी महिलांसाठी आता ३,१११ पदे, तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ६,८०३ पदे राखीव असतील.
Babanrao Taywade : जातनिहाय जनगणना होणार, आंदोलनाची गरज नाही
असा झाला जिल्हानिहाय बदल
जळगाव : ओबीसी सरपंच पदे ३०५ वरून २६६ झाली असून, खुल्या प्रवर्गातील पदे ५२७ वरून ५६६ झाली आहेत.
नांदेड : ओबीसी पदे ३१५ वरून २७० झाली असून, खुल्या प्रवर्गातील पदे ५३९ वरून ५८४ झाली आहेत.
नागपूर : ओबीसी पदे २०४ वरून १५२ झाली आहेत, तर खुल्या प्रवर्गातील पदे ३२६ वरून ३७८ झाली आहेत.
अमरावती : ओबीसी पदे १९६ वरून १७१ झाली असून, खुल्या प्रवर्गातील पदे ३३८ वरून ३६३ झाली आहेत.
याच धर्तीवर उर्वरित ११ जिल्ह्यांतील सरपंच पदांच्या आरक्षणातही फेरबदल करण्यात आला आहे. या सुधारणेमुळे संबंधित जिल्ह्यांतील ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील सरपंच पदांच्या संख्येत बदल झाला आहे.








