Rahul Gandhi’s Chhatron Ki Goonj countered by devendra Fadnavis’s ‘Yuva Manthan’; interaction with youths in Nagpur on Sunday : हजारो ढोल-ताशांच्या महावादनासह होणार विश्वविक्रम
Nagpur पुण्यात आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाने राजकीय वातावरण चांगलेच तापवले असून, काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधील राड्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातून याला थेट प्रत्युत्तर देणार आहेत. रविवारी (ता. २३) सकाळी साडेनऊ वाजता रेशमीबाग मैदानावर ‘उत्सव मंथन युवा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हजारो ढोल-ताशांच्या विक्रमी महावादनासह मुख्यमंत्री फडणवीस युवकांशी थेट संवाद साधणार असून, राहुल गांधी यांच्या आरोपांना भाषणातून सडेतोड उत्तर देणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
जंतरमंतरवरील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना विद्यापीठांमध्ये पाठवून सुरू केलेल्या युवा संवादाच्या पार्श्वभूमीवर, ‘जेन-झी’ला आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमावर ‘तो केवळ काँग्रेस नेत्यांच्या शाळांपुरता मर्यादित’ असल्याची टीका फडणवीसांनी केली होती, तर दुसरीकडे हा कार्यक्रम म्हणजे राहुल गांधी यांचे ‘रिलाँचिंग’ असल्याचा टोला विरोधकांनी लगावला आहे. भाजपने पैसे देऊन विद्यार्थी आणल्याचा आरोप काँग्रेस करत आहे, तर काँग्रेसकडून भाजप घाबरल्याचा दावा केला जात आहे. या संपूर्ण राजकीय रणधुमाळीत उद्याच्या ‘युवा मंथन’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तरुणांना काय संदेश देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








