,rahul-gandhi-pune-congress-meeting-warning-leaders-students-chhatran-ki-goonj : आढावा बैठकीत राहुल गांधींचा काँग्रेस नेत्यांना स्पष्ट संदेश
Pune : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यात दाखल झाले असून, तरुणाईशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यासोबतच पुण्यात विद्यार्थ्यांशी संबंधित घडलेल्या घटनेचीही सविस्तर माहिती राहुल गांधी यांनी घेतल्याचे सांगण्यात आले.
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर झालेल्या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. बैठकीनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना बैठकीतील चर्चेची माहिती दिली. राहुल गांधी यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच पुण्यात विद्यार्थ्यांशी संबंधित काल घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना संघर्ष सुरू ठेवण्याचा संदेश दिल्याचे वडेट्टीवार म्हणाले. “तुम्हाला धमकावण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न केला जाईल; मात्र तुम्ही लढत राहा,” असा संदेश राहुल गांधी यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. Iराज्यातील सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. विरोधकांवर दबाव आणण्याचे प्रयत्न झाले तरी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मागे हटू नये, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींच्या बैठकीतील संदेशाबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजपकडून धमकावण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, मात्र काँग्रेसने संघर्ष सुरूच ठेवावा, असे राहुल गांधींनी सांगितल्याचे ते म्हणाले. “राहुल गांधी कानमंत्र देत नाहीत, कानमंत्र हे भाजपची लोक देत असतात. आमचा त्यावर विश्वास नाही. राहुल गांधी विचार देतात आणि आज त्यांनी आम्हाला ते विचार दिले,” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी राहुल गांधींच्या भूमिकेचे वर्णन केले.
Mahayuti Meeting : महायुतीची मोठी ‘डिनर डिप्लोमसी’ मतभेद मिटवण्याचा प्रयत्न?
यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी सरकारवरही टीका केली. भाजपचे सरकार लोकांच्या मनातून उतरले असून आता केवळ तांत्रिक सरकार उरले आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे अपक्ष खासदार आणि काँग्रेस समर्थक विशाल पाटील यांनी म्हटले. राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यात काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगत विशाल पाटील यांनी काँग्रेसमधील पूर्वीची मरगळ आता दूर झाल्याचे मत व्यक्त केले.
“आम्ही एवढे दिवस प्रयत्न करत होतो. मात्र, आता लोकांमध्ये त्या गोष्टी पोहोचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्याचा आनंद आहे. काँग्रेसमध्ये जी मरगळ असल्याचे म्हटले जात होते, ती आता दूर झालेली पाहायला मिळते,” असे विशाल पाटील यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यात ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम केंद्रस्थानी आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी महाराष्ट्रातील तरुण आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. तरुणाईच्या समस्या, शिक्षण, रोजगार आणि त्यांच्या अपेक्षा याबाबत राहुल गांधी संवाद साधण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन आणि प्रचार करण्यात आला आहे. राहुल गांधींच्या या संवादाकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह तरुणांचेही लक्ष लागले आहे.दरम्यान, राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसकडून कार्यक्रमाचे जोरदार प्रमोशन केले जात असताना भाजप नेत्यांनी त्यावर टीका केली आहे. विद्यार्थ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला केवळ विद्यार्थी संवादाचा कार्यक्रम न राहता राजकीय रंगही चढला आहे.
दुसरीकडे, काँग्रेसने मात्र हा कार्यक्रम तरुणांच्या प्रश्नांना व्यासपीठ देण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यातील विद्यार्थी संवादाबरोबरच काँग्रेस नेत्यांसोबत झालेली बैठकही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रातील आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांशी केलेली चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या घटनेची माहिती घेण्यापासून राज्यातील सामाजिक प्रश्नांवर चर्चा आणि त्यानंतर पक्षातील नेत्यांना संघर्ष सुरू ठेवण्याचा दिलेला संदेश, यामुळे काँग्रेसच्या आगामी राजकीय भूमिकेचे संकेत मिळत आहेत.
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यामुळे काँग्रेसमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना, ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमातून ते तरुणांच्या प्रश्नांवर नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
___








