Rahul Gandhi’s Chhatron ki Gunj is just drama, devendra Fadnavis is real youth icon, says Chandrashekhar bawankule: राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून राजकारण तापले
Nagpur पुण्यात आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, युवक काँग्रेस आणि भाजपच्या एबीव्हीपी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावरून भाजप नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या नावाखाली राहुल गांधी केवळ ‘नौटंकी’ करत असल्याचा घणाघाती आरोप करत बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा आलेख सातत्याने घसरत असून संपत चाललेल्या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करून राजकीय आधार शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्षीय राजकारणासाठी युवकांची माथी भडकवून संघर्षाची परिस्थिती निर्माण करायची आणि त्यातून सहानुभूती मिळवून मते वळवायची, हीच काँग्रेसची जुनी रणनीती आहे.
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात होणाऱ्या ‘झेन-झी संवाद’ कार्यक्रमाबाबत स्पष्ट केले की, देवेंद्र फडणवीस हे नेहमीच महाराष्ट्रातील युवकांचे यूथ आयकॉन राहिले असून, राज्यातील तरुण त्यांच्या भूमिकेशी व विचारांशी पूर्णपणे सहमत आहेत. नागपूरच्या कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातील. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांचा समाचार घेताना ते पुढे म्हणाले की, राजकारणासाठी युवकांचा बळी न देता त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची खरी गरज आहे. मात्र, काँग्रेस राहुल गांधी यांच्या माध्यमातून केवळ स्वतःचा बुडता पक्ष वाचवण्यासाठी युवकांचा गैरवापर करत आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला.








