kangana-ranaut-slams-ramdev-baba-bat-in-bedroom-comment-capitalism-sanatan-dharma : कंगना राणावतचा रामदेव बाबांवर घणाघाती पलटवार
Mumbai : अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणावत आणि योगगुरू रामदेव बाबा यांच्यातील शाब्दिक वाद दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. रामदेव बाबांनी कंगना राणावतच्या तारुण्यावर केलेल्या टिप्पणीवर कंगनाने संतप्त प्रतिक्रिया देत जोरदार पलटवार केला आहे. ‘तुम्ही माझ्या जवानीची चिंता करू नका. तुम्ही तुमच्या तारुण्यात काय केलं? बेडरूममध्ये वटवाघळासारखे लटकलेले होता का?’ अशा बोचऱ्या शब्दांत कंगनाने रामदेव बाबांना सुनावले आहे.
कंगनाने यावेळी रामदेव बाबांच्या विचारसरणीवर आणि त्यांच्या व्यावसायिक विस्तारावरही प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने रामदेव बाबा आता स्वदेशी आणि सनातनी विचारांपेक्षा भांडवलशाहीकडे अधिक झुकल्याचा आरोप केला. योग, आयुर्वेद आणि जडीबुटीपासून सुरू झालेला प्रवास आता कपडे आणि अंडरगार्मेंट्सच्या व्यवसायापर्यंत पोहोचल्याचे सांगत कंगनाने त्यांच्या भूमिकेवर टीका केली. जंतरमंतरवरील आंदोलन करणाऱ्या तरुणांना कंगनाने ‘गटर जनरेशन’ म्हटल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर रामदेव बाबांना कंगनाच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी कंगनाच्या बालपण आणि तारुण्याचा उल्लेख करत टिप्पणी केली होती.
Escape Corporators : भाजपमध्ये जाण्यासाठी निघाले अन् रातोरात शिंदेंच्या शिवसेनेत दाखल
याच वक्तव्यावर कंगना संतप्त झाली. माझ्या बालपणाबद्दल किंवा तारुण्याबद्दल बोलण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या तारुण्यात काय केले, हे सांगावे, असा टोला तिने लगावला. माझ्या तारुण्यातील काही नातेसंबंध होते आणि त्याबाबत संबंधित लोकांना माहिती आहे. मात्र, त्यापेक्षा माझ्या तारुण्यात त्यांनी असे काय वेगळे पाहिले, असा सवालही कंगनाने केला.
रामदेव बाबांनी वैयक्तिक पातळीवर टिप्पणी करणे योग्य नसल्याचे कंगनाने म्हटले. माझ्या आयुष्यातील वैयक्तिक बाबींवर भाष्य करण्यापेक्षा त्यांनी मर्यादा पाळायला हव्यात, असे सांगत कंगनाने त्यांच्यावर निशाणा साधला. माझे बालपण इतर मुलींप्रमाणेच सामान्य होते. आयुष्यात काही नातेसंबंध आले आणि गेले. त्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यावर अशा पद्धतीने टिप्पणी करणे योग्य नाही, अशी भूमिका कंगनाने मांडली.
कंगनाने केवळ वैयक्तिक टिप्पणीवरच रामदेव बाबांना लक्ष्य केले नाही, तर त्यांच्या विचारसरणीवरही प्रश्न उपस्थित केले. रामदेव बाबांनी स्वदेशी चळवळ सुरू केली, त्यावेळी सरकारनेही त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता ते मोठ्या प्रमाणावर भांडवलशाहीमध्ये गुंतल्याचे दिसत असल्याचे कंगनाने म्हटले. सनातनी विचारसरणी आणि भांडवलशाही यांच्यात मूलभूत विरोधाभास असल्याचा दावा करत कंगनाने रामदेव बाबांच्या व्यवसाय विस्तारावर टीका केली. आयुर्वेद, जडीबुटी, औषधी आणि योग यांच्याशी संबंधित कामातून त्यांनी सुरुवात केली; मात्र आता विविध ग्राहक उत्पादनांच्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर भांडवल उभे केले जात असल्याचे ती म्हणाली.
रामदेव बाबा उद्योगपती झाले यावर आपला आक्षेप नसल्याचे कंगनाने स्पष्ट केले. मात्र, जर ते स्वतःला सनातनी विचारांचे प्रतिनिधी मानत असतील, तर त्यांच्या व्यावसायिक उत्पादनांबाबतही प्रश्न उपस्थित होतो, असे तिने म्हटले. रामदेव बाबा बनियान आणि अंडरगार्मेंट्स विकतात. मग ही उत्पादने सनातनी आहेत का, असा सवाल कंगनाने उपस्थित केला. सनातन धर्माच्या नावाने बोलताना दुसरीकडे व्यावसायिक विस्तार करणे हा विरोधाभास असल्याचे तिने म्हटले.
Bjp Message : ‘मित्रपक्षांना सोबत ठेवा, निधीत भेदभाव नको’; २०२९ची तयारी आतापासूनच करण्याचे निर्देश
कंगनाने यावेळी हिंदू धर्म आणि सनातनी विचारांबाबतही आपली भूमिका मांडली. हिंदू धर्मानुसार मार्गक्रमण करणे ही एक प्रकारची तपस्या असल्याचे ती म्हणाली. त्यामुळे सनातन धर्माच्या नावाचा वापर करताना आचरण आणि विचार यांच्यात सुसंगती असणे गरजेचे असल्याचे तिने सूचित केले. मुलाखतीदरम्यान कंगनाने रामदेव बाबांच्या व्यावसायिक कारभारावरही गंभीर आरोप केले. त्यांच्या व्यवसायामुळे आणि जमिनीशी संबंधित व्यवहारांमुळे काही लोकांमध्ये नाराजी असल्याचा दावा तिने केला. काही प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकारल्याचे कंगनाने म्हटले.
कंगना राणावत आणि रामदेव बाबा यांच्यातील हा वाद आता वैयक्तिक टिप्पणीपासून विचारसरणी आणि व्यवसायापर्यंत पोहोचला आहे. एका बाजूला कंगनाने रामदेव बाबांच्या वैयक्तिक वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे, तर दुसरीकडे त्यांच्या सनातनी भूमिकेवर आणि व्यावसायिक विस्तारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे दोघांमधील हा शाब्दिक संघर्ष आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता असून, कंगनाच्या ताज्या वक्तव्यावर रामदेव बाबा काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता राजकीय आणि मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागले आहे.








