taxi-drivers-marathi-language-compulsion-decision-sanjay-raut-amit-shah-mahayuti : संजय राऊतांनी फोडले नव्या वादाला तोंड; अमित शाह यांच्या आदेशावरून निर्णय बदलल्याचा गंभीर आरोप
Mumbai : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्षासाठी लांबणीवर टाकल्याने महायुतीतील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. या निर्णयावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शाह यांच्या आदेशावरूनच मुख्यमंत्र्यांनी मराठी सक्तीचा निर्णय फिरवला, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. तसेच या निर्णयाच्या विरोधात शिंदे गटाच्या शिवसेनेने थेट बंड पुकारावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे मुंबईत मराठी भाषेच्या अस्मितेवरून नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याची भूमिका घेत १५ ऑगस्टची मुदत दिली होती. यासाठी प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात आले होते. मराठी भाषा न शिकणाऱ्या चालकांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला होता. या निर्णयाचे महाराष्ट्रातून स्वागत होत असतानाच काही उत्तर भारतीय टॅक्सी चालकांनी त्याला तीव्र विरोध केला. मराठी शिकणार किंवा बोलणार नाही, अशी भूमिका घेत या चालकांनी विरोध दर्शविल्याने शिवसेना आणि टॅक्सी चालकांमधील वाद चांगलाच पेटला होता.
Government Decision : मोठी बातमी! जरांगे यांच्या आंदोलनाच्या एक दिवस आधीच सरकारचा मोठा निर्णय
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत मराठी सक्तीचा निर्णय एक वर्षासाठी लांबणीवर टाकला. हा निर्णय महायुतीतील सर्व नेत्यांशी चर्चा करून सामूहिकरीत्या घेण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र, निर्णय मागे घेतल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, सुरुवातीला मराठी सक्तीच्या निर्णयावर ठाम भूमिका घेणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अखेर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनीही मराठी भाषा शिकवण्याची मोहीम आणि प्रशिक्षण वर्ग सुरूच राहतील, अशी भूमिका स्पष्ट केली. इतर भाषिक मराठी शिकत आहेत, याचा आनंद आहे, असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मात्र, संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणाचा थेट संबंध दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाशी जोडला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर निर्णय घेतल्यानंतर तो अचानक बदलण्यामागे नेमके कोणाचे आदेश होते, असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी महायुतीच्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. विशेषतः अमित शाह यांच्या आदेशावरून हा निर्णय बदलण्यात आल्याचा आरोप केल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेदांना पुन्हा तोंड फुटले आहे.
Manoj Jarange : ‘आळस झटकून बाहेर पडा, लेकरांसाठी पेटून उठा’; मनोज जरांगे आक्रमक
मराठी भाषेच्या मुद्द्यावर शिवसेनेने घेतलेली आक्रमक भूमिका, मुख्यमंत्र्यांनी निर्णय लांबणीवर टाकणे आणि त्यानंतर संजय राऊतांनी केलेले दिल्लीकडे बोट यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आगामी काळात हा मुद्दा केवळ भाषेपुरता मर्यादित न राहता महायुतीतील सत्तासमीकरण आणि शिवसेनेच्या राजकीय भूमिकेची कसोटी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.








