व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Umesh Patil Vs Mahebub Shaikh : ‘संस्थापकत्व हा इतिहास, मालकीहक्क नाही’ राष्ट्रवादीत...

Umesh Patil Vs Mahebub Shaikh : ‘संस्थापकत्व हा इतिहास, मालकीहक्क नाही’ राष्ट्रवादीत जुना वाद पेटला!

umesh-patil-mahebub-shaikh-ncp-founder-ownership-supriya-sule-post-deleted उमेश पाटलांची पोस्ट डिलीट, मेहबूब शेखांचं जोरदार प्रत्युत्तर;

Mumbai : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पक्षाच्या मालकी आणि संस्थापकत्वावरून पुन्हा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर भाष्य करत ‘संस्थापकत्व हा इतिहास आणि सन्मान आहे; तो तहहयात मालकीहक्क नाही,’ अशी भूमिका मांडली. मात्र, त्यांची ही पोस्ट काही तासांतच समाजमाध्यमांवरून हटवण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी उमेश पाटील यांच्या भूमिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावरील अधिकाराबाबत बोलताना शरद पवार हे पक्षाचे संस्थापक आणि संस्थापक अध्यक्ष असल्याचा दाखला दिला होता. पक्ष चुकीच्या पद्धतीने शरद पवार यांच्याकडून काढून घेण्यात आला असून त्याविरोधातील लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. पक्षाचा अधिकार शरद पवार यांना न्यायाने परत मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर उमेश पाटील यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत संस्थापक आणि पक्षाचा मालक यामध्ये फरक असल्याचे स्पष्ट केले. राजकीय पक्ष हा घर, जमीन, कंपनीतील भागभांडवल किंवा वारसाहक्काने मिळणारी खासगी मालमत्ता नसते. पक्षाची घटना, सदस्य, संघटनात्मक रचना आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पक्ष चालतो, असा युक्तिवाद त्यांनी केला.

Maratha Reservation : जरांगेंच्या मागण्यांवर शिंदेंचे आधीपासूनच काम सुरूफडणवीसांनी टाकला चेंडू थेट शिंदेंच्या कोर्टात

आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ उमेश पाटील यांनी काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष, द्रमुक, अण्णाद्रमुक आणि तेलुगू देसम पक्षांची उदाहरणे दिली. या पक्षांचे संस्थापक आणि आजचे नेतृत्व करणारे नेते वेगवेगळे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘संस्थापकत्व हा इतिहास आहे, नेतृत्व संघटनेचा विषय आहे आणि कायदेशीर मान्यता हा कायद्याचा विषय आहे,’ अशा आशयाची भूमिका त्यांनी मांडली. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आहेत, हा इतिहास नाकारता येणार नाही; मात्र त्यामुळे पक्षावर कायमस्वरूपी वैयक्तिक मालकी निर्माण होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ही पोस्ट काही तासांतच हटवण्यात आली. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ती का डिलीट करण्यात आली, याबाबत उमेश पाटील यांच्याकडून स्पष्ट कारण समोर आलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात या प्रकाराचीही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, उमेश पाटील यांच्या भूमिकेला मेहबूब शेख यांनी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी २५ वर्षांपूर्वी स्वतःच्या राजकीय कष्टातून केली, हा इतिहास कोणत्याही राजकीय सोयीसाठी बदलता येणार नाही, असे त्यांनी म्हटले. शरद पवार यांनी राष्ट्रवादीला कधीही खासगी मालमत्ता म्हटलेले नाही. मात्र, ज्या व्यक्तीने पक्ष उभा केला, त्यांनाच पक्षातून बेदखल करण्याचा नैतिक अधिकार कोणाला आहे, असा सवाल मेहबूब शेख यांनी उपस्थित केला.

काँग्रेस, भाजप आणि अन्य पक्षांची उदाहरणे देणे सोपे आहे; परंतु या पक्षांमध्ये संस्थापकांनी उभ्या केलेल्या पक्षातून त्यांनाच दूर करून सत्तेच्या जोरावर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रकार झाला का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार होते, असा दावा करत पुढे सत्तेच्या राजकारणातून बंड करून पक्ष बळकावण्यात आल्याचे मेहबूब शेख यांनी म्हटले. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Sudhir Mungatiwar : यह साधारण केवल नाम नहीं… सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाला कार्यकर्त्याची अनोखी दाद

‘पक्ष हा कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा असतो,’ हे मान्य असले तरी पक्ष उभा करणाऱ्या नेत्याला त्याच पक्षातून बेदखल करून त्याच्याच विचारांच्या नावावर राजकारण करणे ही कोणती नैतिकता, असा सवाल शेख यांनी केला. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘संस्थापकत्व विरुद्ध संघटनात्मक व कायदेशीर मान्यता’ हा जुना वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन्ही गटांकडून आपापल्या भूमिकेचे समर्थन केले जात असताना हा वाद आता आगामी राजकीय घडामोडींमध्ये कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

error: Content is protected !!