maharashtra-rain-weather-forecast-vidarbha-marathwada-buldhana-latur-mahabaleshwar-rain : विदर्भ-मराठवाड्यात बळीराजा दुबार संकटात
Mumbai : राज्यात पावसाचे चित्र सध्या कमालीचे विस्कळीत झाले आहे. एका बाजूला महाबळेश्वरसारख्या भागात पावसाने सहा हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडत अक्षरशः कहर केला आहे, तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील अनेक भागांत शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असून काही भागांत रोगराई आणि वाढत्या उत्पादन खर्चाने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
राज्यात मागील काही दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत असल्या, तरी बहुतांश भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून पावसासाठी वातावरण पोषक असतानाही त्याचे वितरण समान नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेचे विरोधाभासी चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये मागील सुमारे महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर सोयाबीन आणि कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र पावसाअभावी पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आगामी काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील तांदुळजा गाव आणि परिसरात पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरात मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असून त्यातील काही भागातील पाने पिवळी पडत आहेत. त्यातच अळीचा प्रादुर्भावही दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या संरक्षणासाठी फवारणीचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे
Sadabhau Khot : ‘बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, आपण फक्त बघत बसलो’
आधीच पावसाअभावी उत्पादन धोक्यात आले असताना रोगराईवर औषध फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. फवारणी करूनही अपेक्षित उत्पादन मिळेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. लातूर जिल्ह्यात पावसाचा प्रश्न असतानाच शेतमालाच्या दरानेही शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. रेणापूर तालुक्यातील हनुमंतवाडी येथील शेतकऱ्याने बाजारभाव कोसळल्याने एकरभर कोथिंबिरीच्या पिकावर नांगर फिरवला. एक एकर कोथिंबिरीसाठी बी-बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर सुमारे ५० हजार रुपये खर्च झाला. काढणीसाठी आणखी खर्च अपेक्षित असताना बाजारभाव मात्र अत्यंत घसरला. गेल्या वर्षी सुमारे ५०० रुपयांना मिळणारा कॅरेट यंदा अवघ्या ३० रुपयांपर्यंत आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने त्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, राज्याच्या दुसऱ्या टोकाला चित्र पूर्णपणे वेगळे आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने तब्बल सहा हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला असून गेल्या दोन महिन्यांपासून परिसरात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये एका दिवसात तब्बल ५१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि ओसंडून वाहणारे धबधबे यामुळे परिसराचे निसर्गसौंदर्य खुलले असले, तरी या विक्रमी पावसाचा फटका जनजीवनालाही बसला आहे. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
Umesh Patil Vs Mahebub Shaikh : ‘संस्थापकत्व हा इतिहास, मालकीहक्क नाही’ राष्ट्रवादीत जुना वाद पेटला!
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात काही भागांत वादळी पावसाची शक्यता असून हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असली तरी काही भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र सध्या मोठ्या पावसाचा विशेष इशारा नसून काही भागांत पुन्हा कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. एकीकडे महाबळेश्वरमध्ये पावसाचा विक्रमी मारा आणि दुसरीकडे विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पावसासाठी सुरू असलेली प्रतीक्षा, त्यात रोगराई आणि बाजारभावाचा दुहेरी फटका, यामुळे राज्यातील बळीराजासमोर यंदा दुबार संकट उभे राहिले आहे.








