2.77 lakh voters missing from Akola district; final electoral roll to be published on November 4 : १३.१८ लाख मतदारांची प्रारूप यादी जाहीर; एसआयआर प्रक्रियेत ‘अनकलेक्टेबल’ मतदारांची नोंद
Akola भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण १३ लाख १८ हजार ६५२ मतदार असल्याचे प्रारूप यादीत स्पष्ट झाले आहे. यामध्ये ६ लाख ८३ हजार ४०५ पुरुष, ६ लाख ३५ हजार २१५ महिला आणि ३२ इतर मतदारांचा समावेश आहे.
मात्र, एसआयआरच्या प्रक्रियेत २ लाख ७६ हजार ९९२ मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या गणना प्रक्रियेत संबंधित मतदारांकडून गणना प्रपत्रे भरून परत न मिळाल्याने त्यांना ‘अनकलेक्टेबल’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
अकोटमध्ये ५५ हजारांहून अधिक मतदार ‘अनकलेक्टेबल’
मतदारसंघनिहाय प्रारूप मतदारसंख्या पाहता अकोट विधानसभा मतदारसंघात २ लाख ६५ हजार ४६३, बाळापूरमध्ये २ लाख ७१ हजार ७९९, अकोला पश्चिममध्ये २ लाख ३८ हजार ६२२, अकोला पूर्वमध्ये २ लाख ७४ हजार ९०५, तर मूर्तिजापूर (अ.जा.) मतदारसंघात २ लाख ६७ हजार ८६३ मतदार आहेत.
‘अनकलेक्टेबल’ श्रेणीत अकोटमधील ५५ हजार १८, बाळापूरमधील ३६ हजार ५५, अकोला पश्चिममधील तब्बल ९४ हजार ९३९, अकोला पूर्वमधील ७५ हजार २८८ आणि मूर्तिजापूरमधील २९ हजार २६१ मतदारांचा समावेश आहे. संबंधित मतदारांची यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Cjp march : कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार
विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन गणना प्रपत्रे भरून घेण्यात आली. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांना आता दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे.
३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित मतदारांना नमुना क्रमांक ६ द्वारे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच, १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही या कालावधीत अर्ज करता येईल.
१.४९ लाख मतदारांना नोटिसा
मागील मतदार यादीशी जुळणी न झालेल्या किंवा जुळणी प्रक्रियेत विसंगती आढळलेल्या १ लाख ४८ हजार ९९२ मतदारांना नोटिसा बजावून सुनावणी घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी पाचही विधानसभा मतदारसंघांत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसह एकूण १२४ सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २४(अ) तसेच मतदार नोंदणी नियम, १९६० मधील नियम २७ नुसार १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता येणार आहे.
जिल्ह्यात आता १,७४० मतदान केंद्रे
मतदारसंघातील मतदारसंख्येच्या अनुषंगाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील शेलूबाजार येथील एकाच इमारतीतील दोन मतदान केंद्रांपैकी केंद्र क्रमांक २१ हे केंद्र क्रमांक २० मध्ये पूर्णपणे समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या एकने कमी झाली असून, सुसूत्रीकरणानंतर एकूण १ हजार ७४० मतदान केंद्रे राहणार आहेत.
Devendra Fadnavis : कॉक्रोच हे काँग्रेसचेच पिल्लू; पुन्हा फेक नॅरेटिव्ह फॅक्टरी
मतदारांसाठी मदत कक्ष सुरू
एसआयआर प्रक्रियेदरम्यान नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. मतदारांना टोल फ्री क्रमांक १९५० तसेच ९१८०६५९०९८४४ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.
प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकती आणि नोटिसांवरील सुनावणीची प्रक्रिया २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.








