fda-guidelines-bhandara-mahaprasad-food-safety-tukaram-mundhe : ७ दिवस आधी सूचना देणे बंधनकारक, स्वच्छतेपासून साठवणुकीपर्यंत कडक निर्देश
Mumbai : सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणाऱ्या भंडारा, महाप्रसाद, अन्नछत्र आणि लंगराच्या आयोजनासाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, तसेच अन्नातून होणाऱ्या आजारांना आळा बसावा, यासाठी आयोजक आणि अन्न व्यावसायिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सामूहिक अन्नवाटपाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनी कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी विहित नमुन्यात पूर्वसूचना पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे. परवानाधारक किंवा नोंदणीकृत केटरर अथवा स्वयंपाकगृहामार्फत अन्न तयार करून त्याचे वितरण केले जात असल्यास ही प्रक्रिया विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
स्वच्छता आणि अन्न सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
महाप्रसाद किंवा भंडाऱ्यादरम्यान स्वच्छ परिसर, सुरक्षित पाण्याचा वापर, अन्नाचे योग्य तापमान राखणे, कच्चे आणि शिजवलेले अन्न स्वतंत्र ठेवणे, अन्न हाताळणाऱ्या व्यक्तींची वैयक्तिक स्वच्छता आणि अन्नाची सुरक्षित साठवणूक याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न दूषित होणार नाही याची जबाबदारी आयोजक आणि संबंधित अन्न व्यावसायिकांवर राहणार आहे.
Brics summit 2026 : पुतीन भारतात दाखल, जिनपिंगही लवकरच येणार
प्राप्त पूर्वसूचनांच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाकडून जोखीमाधारित तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार अन्नपदार्थांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन कठोर भूमिका घेत असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
मुदतबाह्य किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री अथवा साठवणूक करणाऱ्यांवरही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा तसेच मांसाहारी पदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळीची शक्यता लक्षात घेऊन एफडीएने वर्षभराचे नियोजन केले आहे.
Sir Voter list : २ कोटी मतदार गायब, १.२२ कोटी नोंदींमध्ये घोळ
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्या यांचा राज्यव्यापी श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, वारी, श्रावण, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती हे प्रादेशिक स्तरावर, तर स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरूस हे स्थानिक स्तरावर वर्गीकृत करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक सूचनांमुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांमध्ये अन्न सुरक्षा अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे.








