uday-samant-reply-aditya-thackeray-rohit-pawar-criticism : रोहित पवारांनाही दिला राजकीय सल्ला
Mumbai : राज्यातील विविध प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यावर तसेच त्यांना मिळालेल्या पुरस्कारावरून केलेल्या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. ‘टीका करण्यापेक्षा संयम ठेवून काम करा’, असा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला.
नंदुरबार दौऱ्यावर असताना उदय सामंत यांनी जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. नंदुरबार जिल्ह्यात सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून गुजरातमधूनही काही उद्योग महाराष्ट्रात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आदित्य ठाकरे ज्या राज्याचा उल्लेख करतात, त्याच राज्यातून प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याचा दावा करत सामंत यांनी आदित्य यांच्या पत्रकार परिषदेला आपल्या विभागाच्या कामाचे हेच उत्तर असल्याचे म्हटले.
आदित्य ठाकरे यांनी सामंत यांच्या मतदारसंघातील लोटे एमआयडीसी परिसरातील समस्यांवरून केलेल्या टीकेवरही सामंत यांनी भाष्य केले. ‘इकडे खड्डे, तिकडे खड्डे’ असे सांगण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. आपल्या मतदारसंघात महिलांनी आदित्य ठाकरेंना शौचालये आणि गटारींच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी केल्याचा दावाही सामंत यांनी केला.
‘माझी आमदारकीची पाचवी टर्म आहे, तर टीका करणाऱ्यांची दुसरी टर्म आहे. त्यामुळे थोडं संयमाने घ्या. मी जास्त बोलत नाही, कामाने उत्तर देतो,’ असे म्हणत सामंत यांनी आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. एमपीएससी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून आंदोलन करणारे आमदार रोहित पवार यांच्यावरही उदय सामंत यांनी टीका केली.
जमलेली गर्दी आणि कार्यकर्ते मोर्चाची तयारी करतात आणि शेवटी नेता झेंडा घेऊन पुढे उभा राहतो, अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांना टोला लगावला. विद्यार्थ्यांच्या भावना पुढे करून कोणीही राजकारण करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरूनही सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Sir Voter list : २ कोटी मतदार गायब, १.२२ कोटी नोंदींमध्ये घोळ
काही राजकीय पक्षांना विद्यार्थी आपल्या बाजूने असल्याचे वाटत असले, तरी जनता कोणाचा राजकीय वापर होत आहे हे ओळखते, असा दावा त्यांनी केला. आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनताच योग्य उत्तर देईल, असेही सामंत यांनी म्हटले.








