manoj-jarange-patil-mumbai-agitation-permission-denied-new-application-big-announcement : उपचार-पाणीही बंद, आज मोठी घोषणा होण्याची शक्यता?
Jalna : मुंबईतील आंदोलनाच्या तयारीला वेग आलेला असतानाच मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. आझाद मैदान पोलिसांनी त्यांच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मात्र, पोलिसांच्या या निर्णयाने जरांगे पाटील मागे हटलेले नसून उलट अंतरवाली सराटीत रात्रीपासूनच हालचालींना वेग आला आहे. आता त्यांच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी १५ सप्टेंबरपासून मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली आहे. त्याआधीच आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे. परवानगीसाठी पुन्हा अर्ज करण्याच्या सूचना जरांगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार त्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी आझाद मैदान पोलिसांकडे नव्याने अर्ज दाखल केला आहे.
विशेष म्हणजे, परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका आणखी आक्रमक केली आहे. नियम आणि अटी मान्य असल्याचे कागद तातडीने तयार करून त्यावर स्वाक्षरी करण्याच्या सूचना त्यांनी सहकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे नव्या अर्जानंतर पोलिसांकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सोमवारी १७वा दिवस आहे. पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे. सलाईन बंद केल्यानंतर त्यांनी पाणी घेणेही थांबवल्याचे सांगितले जात आहे. रात्री दोन वेळा वैद्यकीय पथक अंतरवाली सराटीत तपासणीसाठी गेले; मात्र उपचार घेण्यास त्यांनी नकार दिल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मुंबईकडे जाण्याच्या तयारीलाही मराठा समाजाकडून वेग देण्यात आला आहे. १५ सप्टेंबरचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे प्रस्तावित असून, वाहनांसाठी सुमारे ८० एकर जागेवर पार्किंगची तयारी सुरू आहे. तसेच विविध ठिकाणी पार्किंग आणि अन्नछत्राची व्यवस्था उभारली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वांच्या नजरा आज दुपारी १२ वाजता होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेकडे लागल्या आहेत. परवानगी नाकारल्यानंतर ते नेमकी कोणती भूमिका जाहीर करणार, कोर्टाचा मार्ग स्वीकारणार की आंदोलनाबाबत नवा निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता आहे.
Manoj jarange : मनोज जरांगेंनी तारीख बदलली; आता १९ सप्टेंबरला मुंबईत धडकणार
दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आंदोलन काही काळ पुढे ढकलले असते तर योग्य झाले असते, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे जरांगेंच्या पुढील भूमिकेमुळे सरकारसमोरील पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता अंतरवाली सराटीतून आज जरांगे कोणती घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
___








