पैशाच्या देवाणघेवाणीच्या एका व्हायरल व्हिडिओवरून पेटलेला वाद नव्या वळणावर
Nagpur पैशाच्या देवाणघेवाणीच्या एका व्हायरल व्हिडिओवरून पेटलेला भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील यांच्यातील वाद आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. मी सनातनी हिंदू आहे आणि पितृपक्षात पाणी पाजणे ही आपली परंपरा आहे, असे रोखठोक वक्तव्य दयाशंकर तिवारी यांनी केल्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये वादाला नव्याने सुरूवात होणार आहे. आता या पितृपक्षात कोण कोणाला ‘पाणी पाजणार’, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताना प्रफुल गुडधे यांनी भाजपचे दुकान माझ्या वडिलांनी सुरू केले होते आणि मुलगा म्हणून ते दुकान मीच बंद करणार, असा थेट दावा केला होता. तेव्हापासून भाजप नेते आणि गुडधे यांच्यात वाद पेटला आहे. या राजकीय संघर्षादरम्यान काँग्रेसकडून भाजपवर आरोप करताना एक पैसे मोजतानाचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओचा संबंध थेट जोडला गेल्याने दुखावलेल्या दयाशंकर तिवारी यांनी प्रफुल गुडधे यांना आठ दिवसांत माफी मागण्याचा, अन्यथा १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता.
मानहानीच्या नोटिसीबाबत गुडधे यांना विचारले असता, त्यांनी दावा ठोकण्याचा इशारा दिला होता, त्याचे काय झाले ते त्यांनाच विचारा. कोर्टात दावा ठोकल्यास काय करायचे हे मी ठरवेन, असे सांगत गुडधे यांनी तिवारींचे आव्हान स्वीकारले होते. हा विषय थंड पडल्यासारखा वाटत असतानाच माध्यमांनी पुन्हा विचारणा केल्यावर दयाशंकर तिवारी एकदम ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पितृपक्षाचा संदर्भ देत गुडधेंना थेट इशारा दिला आहे.
तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे !
दयाशंकर तिवारी आता प्रत्यक्षात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकून गुडधेंना न्यायालयात खेचतात, की पितृपक्षाच्या मुहूर्तावर एखादा नवा राजकीय गौप्यस्फोट करून काँग्रेसला उघडे पाडतात त्यास प्रफुल गुडधे आता काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष लागले आहेत.








