शरद पवारांच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण
Wardha : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नितेश कराळे गुरुजी यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने राजकीय चर्चेला वेग आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांना पुन्हा मैदानात उतरविण्याची तयारी असल्याच्या पार्श्वभूमीवर कराळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नितेश कराळे गुरुजी यांनी २०२० मध्ये अपक्ष म्हणून नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांना ४ हजार ३१४ मते मिळाली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याची भूमिका घेतल्यास त्याचा राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरणार आहे.
५०० ट्रक, ४० टोलनाक्यांचे मालक प्यारे खान आरटीओला एवढे ‘प्यारे’ का?
मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कराळे गुरुजी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सांभाळत आहेत. दुसरीकडे नागपूर पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याने आघाडीतील संभाव्य उमेदवारीचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी नितेश कराळे गुरुजी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी आमदार चरण वाघमारे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर कराळे यांच्या पुढील भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात तर्क – वितर्कांना उधाण आले आहे.
कराळे गुरुजी यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली, तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचे आव्हानही त्यांच्या समोर आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आणि कराळे यांना निवडणूक लढण्याबाबत कोणता सल्ला देण्यात आला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मुहूर्त मिळेना, जिल्हाप्रमुख ठरेना! शिंदेसेनेची जिल्ह्यातील सूत्रे कुणाच्या हाती?
पवार यांच्या भेटीनंतर कराळे गुरुजी आपली उमेदवारी कायम ठेवतात की आघाडीतील निर्णयाचा मान राखत भूमिका बदलतात, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. २०२० मध्ये ४ हजारांहून अधिक मते मिळविलेल्या कराळे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे यंदाच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर चर्चेला नवी दिशा मिळाली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी मतदान २३ ऑक्टोबरला होणार असून मतमोजणी २७ ऑक्टोबरला होणार आहे.








